लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतलेल्या सूर्या प्रादेशिक प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा नुकताच यशस्वीरीत्या पार करण्यात आला. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील वसई विभागामधील तुंगारेश्वर येथील ४.४५ किमी लांबीच्या बोगद्याचे ४ किमी अंतराचे भुयारीकरण पूर्ण करण्यात आले असून या प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्याचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प मार्च २०२४ मध्ये पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा मानस असून यामुळे मिरा-भाईंदरमधील गावांची तहान भागणार आहे.

एमएमआरडीएने १३२५.७८ कोटी रुपये खर्चाच्या सूर्या प्रादेशिक पाणी प्रकल्पाचे काम २०१७ पासून हाती घेतले आहे. या प्रकल्पामुळे वसई – विरार आणि मीरा – भाईंदर महानगरपालिकेला ४०३ दशलक्ष लिटर क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प याआधीच पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हा प्रकल्प रखडला होता. आता या प्रकल्पाचे काम वेगाने करण्यात येत आहे. या प्रकल्पातील वसई – विरारसाठीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.

हेही वाचा… नायर रुग्णालयात सप्टेंबरअखेर नवे CT SCAN यंत्र कार्यान्वित होणार

आता दुसऱ्या टप्प्यातील कामानेही वेग घेतला आहे. दुसऱ्या टप्प्यातील ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. या टप्प्यातील अंत्यत महत्त्वाच्या अशा ४.४५ किमी लांबीच्या तुंगारेश्वर बोगद्यातील ४ किमीचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे. या २.८५ मीटर व्यासाच्या बोगद्याचे ८९ टक्के काम पूर्ण झाले असून बोगदा सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तर दुसरा टप्पा मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा

सूर्या प्रकल्पाअंतर्गत मिरारोड – भाईंदरला दररोज २१८ दशलक्ष लिटर, तर वसई – विरारला दररोज १८५ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. वसई – विरारची तहान भागविणारा पहिला टप्पा पूर्ण झाला असून या टप्प्याचे लोकार्पण जूनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घातला होता. मात्र लोकार्पण आणि वसई – विरारकरांची मुबलक पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा लांबली आहे. मुखमंत्र्यांची वेळ न मिळाल्याने आणि त्यानंतर आता राजकीय परिस्थिती बदलल्याने लोकार्पण लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्या जलवाहिन्यांची तपासणी आणि चाचणी सुरू आहे. या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर पहिला टप्पा कार्यान्वित करण्यात येईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Under the surya regional water project undertaken by mmrda 70 percent of the second phase of the project has been completed mumbai print news dvr
Show comments