इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता
मुंबई : सागरी किनारा मार्गाच्या कामासाठी हाजीअली येथील भूमिगत मार्गाचे समुद्राकडील एक प्रवेशद्वार बंद केले जाणार आहे. येत्या २५ नोव्हेंबरपासून या ठिकाणी सागरी किनारा मार्गाशी संबंधित काम सुरू होणार असून त्यामुळे हा भूमिगत मार्ग किमान महिन्याभरासाठी बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे हाजीअलीकडे येणाऱ्या पर्यटकांना रस्ता ओलांडूनच पलिकडे जावे लागणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारा रस्ता प्रकल्पातील प्रिन्सेस स्ट्रीट – वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंतचे बांधकाम सुरू असून प्रकल्पाचे ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गाची लांबी १०.५८ किलोमीटर आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना आवश्यकतेनुसार मार्ग बदल करता यावा किंवा बाहेर पडता यावे याकरीता या मार्गावर तीन ठिकाणी आंतरबदल (इंटरचेंज) तयार करण्यात येणार आहेत. त्यापैकी अमरसन्स उद्यान, हाजीअली, वरळीसी येथे आंतरबदल तयार करण्यात येणार आहेत. त्यापैकी हाजीअली येथील आंतरबदलाचा एक फाटा (आर्म) हा हाजीअलीच्या भूमिगत मार्गाजवळून जाणार आहे. हे काम करण्यासाठी सध्याच्या भूमिगत मार्गाचे समुद्राकडचे हाजी अली ज्यूस सेंटरच्याजवळ असलेले प्रवेशद्वार काही काळासाठी बंद करावे लागणार आहे. पालिका प्रशासनाने त्याकरीता तयारी सुरू केली आहे. या भूमिगत मार्गाचे समुद्राकडचे प्रवेशद्वार येत्या शनिवारी २५ नोव्हेंबरपासून बंद केले जाणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे हाजीअलीकडे येणाऱ्या पर्यटकांना पुढील काही दिवस भूमिगत मार्गाचा वापर करता येणार नाही. पुढील किमान महिनाभर हा भूमिगत मार्ग बंद ठेवावा लागणार आहे. थेट पुढील वर्षी जानेवारी महिन्यात हा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे.
हाजीअली येथे समुद्रात भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे भूमिगत मार्गाचे समुद्राकडील प्रवेशद्वार पाच ते सहा मीटर आत उघडणार आहे. त्यामुळे येत्या काळात हाजीअली परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे. सध्याच्या प्रवेशद्वाराच्या जागी या प्रस्तावित मार्गावरील आंतरबदलाचा एक मार्ग येणार आहे.
दरम्यान, या प्रकल्पाचे काम ८२ टक्के पूर्ण झालेले असले तरी वरळी येथे पुलाच्या खांबांमधील अंतर वाढवून देण्याच्या मागणीमुळे या प्रकल्पाचे काम रखडले होते. त्यामुळे हा मार्ग वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडण्याचा महत्त्वाचा टप्पा पार पाडण्यास वेळ लागणार आहे. हा टप्पा पूर्ण होण्यास मे २०२४ उजाडणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत केवळ हाजीअली किंवा वरळीपर्यंतचाच भाग, तोही एकच बाजूने सुरू होण्याची शक्यता आहे.