मुंबईतील बांधकाम व्यवसायात गुन्हेगारी विश्वाचा पैसा मोठय़ा प्रमाणावर असून गेले तीन-चार वर्षे त्याबाबत काही सुगावा लागूनही आधीच्या सरकारने काहीही केले नाही. पण आम्ही  देशविघातक शक्तींना सोडणार नाही. त्याचा छडा लावला जाईल आणि हे हितसंबंध उद्ध्वस्त केले जातील, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला. गुन्हेगारी प्रवृत्तींना आणि दहशत माजविणाऱ्यांना संरक्षण दिले जाणार नाही. कोणतीही संघटना किंवा जाती-धर्मापलीकडे जाऊन या शक्तींचे कंबरडे मोडले जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना, अंडरवर्ल्डच्या पैशांचा बांधकाम व्यवसायातील वापर न रोखल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी आधीच्या सरकारवर ठपका ठेवला. कोणत्याही उद्योजक किंवा व्यावसायिकास गुन्हेगारी टोळ्यांकडून धमक्यांचे दूरध्वनी आल्यास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. त्यांचे नाव गुप्त ठेवून तातडीने कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दाभोळकर तपास
 डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी नागोरी याच्याकडून काही छडा लावण्याचा प्रयत्न सीबीआय करीत आहे. त्याच्याकडे सापडलेले रिव्हॉल्वर आणि दाभोळकर यांच्यावर झाडण्यात आलेल्या गोळ्यांमध्ये साम्य आढळून आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Story img Loader