अभिनेत्री प्रीती झिंटा आणि उद्योगपती नेस वाडिया वादात आता अंडरवर्ल्डने उडी घेतली आहे. कुख्यात डॉन रवी पुजारीने नेस वाडिया आणि त्याचे वडील नस्ली वाडिया यांना ‘प्रीतीच्या प्रकरणात लक्ष घालू नका’, अशी धमकी दिली आहे. इराणमधून फोन आणि एसएमएसद्वारे ही धकमी देण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथक या प्रकरणाची चौकशी करत आहे.
३० मे रोजी वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या आयपीएल सामन्यादरम्यान माजी प्रियकर आणि उद्योगपती नेस वाडियाने आपला विनयभंग केल्याची तक्रार प्रीतीने दिली होती. ती सध्या परदेशात असून या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच या धमक्या देण्यात आल्या.सोमवारी भायखळा येथील वाडिया यांच्या कार्यालयात हे धमकीचे फोन आणि एसएमएस आले होते.
सुरुवातीला कार्यालयातील लॅण्ड लाईनवर फोन आला आणि नंतर वाडिया यांच्या दोन स्वीय सहाय्यकांच्या मोबाईलवर एसएमएस आला. प्रीतीाच्या मागे लागणे सोडा अन्यथा व्यवसायात नुकसान होईल असा संदेश इंग्रजीतून पाठविण्यात आला होता. त्याची तक्रार ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली. सध्या गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. हे फोन इराणहून आले होते. आम्ही आवाजाचे नमुने तपासत आहोत. तसेच सेवा पुरवठादाराकडून मोबाईल कुणाचा आहे ते तपासत आहोत, असे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले.