केंद्रातील आघाडी सरकारच्या काळात देशात महागाई आणि भ्रष्टाचार मोठय़ा प्रमाणात वाढला असून येत्या लोकसभा निवडणूकीत हे दोन मुद्दे घेऊनच समाजवादी पक्ष निवडणूका लढवणार असल्याचे संकेत उत्तर प्रदेश निवडणूकीत समाजवादी पक्षाच्या प्रचाराची संपूर्ण धुरा सांभाळणारे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गुरुवारी वाशी येथील कार्यक्रमात दिले.
पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुदतपूर्व निवडणूकांसाठी तयार राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने नवी मुंबई (वाशी) येथे तीन हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर ३२ कोटी रुपये खर्च करुन चार मजली इमारतीचे उत्तरप्रदेश भवन उभारण्यात आले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा आज यादव यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी उत्तर प्रदेश विधानसभा अध्यक्ष माताप्रसाद पांडे, पर्यटन मंत्री ओमप्रकारश सिंह, नवी मुंबईचे महापौर सागर नाईक, आमदार आबू आझमी, कुपाशंकर सिंह आणि काँग्रेसचे नेते हरिवंश सिंह उपस्थित होते.
जातीयवादी पक्षांना दूर ठेवण्यासाठी समाजवादी पक्षाने केंद्रीताल आघाडी सरकारला पांठिबा दिला होता. याचा अर्थ काँग्रेसची धोरणे सपाला मान्य आहेत असा होत नाही. येत्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेस आणि भाजपा यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सपा तिसरी आघाडी उभी करण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.   उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या वचनांची पूर्तता एका वर्षांत करण्यात आल्याने पक्षाचा जनाधार वाढला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युपी सरकारच्या लॅपटॉप वाटप, रोजगार भत्ता, मुलींना विद्यावेतन यासारख्या योजनांची सध्या देशात नक्कल केली जात असून यापुढे अनेक योजनांचा युपी पॅर्टन तयार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
साखर, उस, गहू, दूध यासारख्या उत्पादनात उत्तर प्रदेश सरकार महाराष्ट्र सरकारच्या पुढे आहे असे यादव यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. १५ लाख विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटप केले जाणार आहे. या योजनेची विरोधकांकडून खिल्ली उडवली जात आहे. वीजेचा तुटवडा असल्याने हे लॅपटॉप चार्ज कुठे करणार असा सवाल केला जात आहे. राज्य सरकार वीजनिर्मितीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी ऊसापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरु करण्याचा विचार केला जात आहे.