धुमसणाऱ्या आगीत स्वत:ला झोकून देणाऱ्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतीत बेधडक मदतीसाठी धावणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांना दिल्या जाणाऱ्या गणवेषातील मोठा भ्रष्टारात उजेडात आला आहे. मात्र केवळ विभागीय अग्निशमन अधिकाऱ्याला निलंबित करुन भ्रष्टाचाराचा अध्याय बंद करण्यात आला आहे. मोठे मासे मात्र आजही मोकाट वावरत असल्याची चर्चा अग्निशमन दलात दिवसभर सुरू होती.
आपत्कालीन समयी मदतकार्यासाठी धावणाऱ्या अग्निशमन दलातील जवानांना प्रत्यक्ष मदतकार्य, परेड आणि कार्यशाळेत जाण्यासाठी तीन वेगवेगळे गणवेष दिले जातात. या गणवेषांसाठी विशिष्ठ प्रकारचे कापड वापरण्यात येते. अधिकारी आणि जवानांना गणवेष पुरविण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून गणवेषाऐवजी त्यांना पैसे दिले जात आहेत. याबाबत काही जवानांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु अग्निशमन दलातील वरिष्ठांनी त्याकडे कानाडोळा केला. मात्र दोन महिन्यांपूर्वी उपायुक्तपदाची सूत्रे हाती घेतलेल्या पवार यांनी या तक्रारींची गंभीर दखल घेत दक्षता विभागाला चौकशीचे आदेश दिले होते. दक्षता विभागाने चौकशी करुन या प्रकरणी विभागीय अग्निशमन अधिकारी (भांडार व कार्यशाळा) ए. व्ही. बनकर यांच्यावर ठपका ठेवला. त्यानुसार शुक्रवारी रात्री उशीरा ए. व्ही. बनकर यांना निलंबित करण्यात आले.
गेली काही वर्षांपासून अग्निशमन दलातील सुमारे २५०० अधिकारी-जवानांना गणवेष देण्याऐवजी पैसे देण्याची नवी प्रथा सुरू झाली आहे. गणवेषाची किंमत चार हजार रुपये होत असताना त्यांना दोन हजार रुपये देण्यात येत होते. मात्र २०११ मध्ये तेही त्यांना मिळाले नाहीत. कार्यशाळेतील कामाचे स्वरुप लक्षात घेऊन जवानांना विशिष्ठ प्रकारचा गणवेष (खंदा ड्रेस) दिला जातो. त्यासाठी कंत्राटदाराकडून दोन हजार रुपये दिले जात होते. परंतु अलीकडेच जवानांच्या हातावर ७०० रुपये टेकवून कंत्राटदाराने हात वर केले.
जवानांनी याबाबत केलेल्या तक्रारीकडे अग्निशमन दलातील वरिष्ठ कानाडोळा केला. अखेर पालिकेतील उपायुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन हे प्रकरण उघडकीस आणले आणि बनकर यांना निलंबित केले.
वरिष्ठांच्या आदेशाशिवाय गणवेष वाटपाच्या प्रक्रियेत बदल होऊ शकत नाही. त्यामुळे या भ्रष्टाचारातील मोठे मासे मोकळेच आहेत. काही वर्षांपूर्वी विदेशातील अग्निशमन अधिकाऱ्यांसारखा गणवेष जवानांना देण्यात आला होता. भारतीय वातावरणात तो कुचकामी ठरला. त्याची किंमत सुमारे ८० हजार रुपयांच्या घरात होती. परंतु आपल्याला दिलेला हा गणवेष खरच ८० हजाराचा होता का, असा प्रश्न जवानांना पडला आहे.