लोकसभा आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील रखडलेल्या प्रकल्पांसाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात निधी उपलब्ध केला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) एमयुटीपी २, ३ आणि ३ ए प्रकल्पांसाठी ५७८ कोटी रुपये मंजुर केले आहेत. एवढीच रक्कम राज्य सरकारकडूनही मिळणार असल्याने एकूण १ हजार १५६ कोटी रुपये महामंडळाच्या तिजोरीत येतील. त्यामुळे ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग, कुर्ला ते सीएसएमटी पाचवा-सहावा मार्गासह अन्य महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागतील. याचबरोबर पश्चिम व मध्य रेल्वेवरील पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट, फलाट, एकात्मिक सुरक्षा प्रणाली मंजुर करतानाच निधीही उपलब्ध केला आहे.

यंदाच्या सादर होणाऱ्या केंद्रीय अंर्थसंकल्पात रखडलेल्या प्रकल्पांना आर्थिक बळ मिळेल, यासाठी एमआरव्हीसी, पश्चिम व मध्य रेल्वेकडून प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार अर्थसंकल्पात एमआरव्हीसीच्या एमयुटीपी-२ साठी २२४ कोटी ९२ लाख रुपये मिळाले आहेत. मिळालेल्या निधीमुळे तीन महत्त्वाचे प्रकल्प पुढे सरकण्यास मदत मिळणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्गाचे काम पुढे सरकेल.  प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत अनेकवेळा मुदत देण्यात आली.  ११५ कोटी रुपये असलेल्या प्रकल्पाची किंमत ४४० कोटीपेक्षा जास्त रुपयांवर पोहोचली. मात्र प्रकल्पाचे काम काही केल्या पूर्ण झाले नाही. जमिन संपादन आणि अन्य तांत्रिक मुद्दयामुळे प्रकल्प रखडला व त्याची किंमत वाढत गेली. आता या निधीमुळे तरी प्रकल्प पुढे सरकण्याची आशा आहे. याबरोबरच मुंबई सेन्ट्रल ते बोरीवली सहावा मार्ग आणि सीएसएमटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्गाचेही काम याच मिळालेल्या निधीतून पुढे सरकणार आहे. सध्या सीएसएमटी ते कुर्ला प्रकल्पातील कुर्ला ते परळ पर्यंतचे काम जोमाने सुरू आहे. याच प्रकल्पातील परळ टर्मिनसदेखिल असून तोही लवकरच सेवेत येईल. मुंबई सेन्ट्रल ते बोरीवली पाचवा आणि सहावा मार्गापैकी काही वर्षांपूर्वी पाचव्या मार्गाचे काम पूर्ण झाले. तर सहाव्या मार्गासाठी निधीची गरज होती. अर्थसंकल्पातून तोही मार्गी लागेल. या तीनही प्रकल्पांच्या कामे पूर्ण झाल्यास मेल-एक्सप्रेस गाडय़ांना स्वतंत्र मार्गिका मिळेल व लोकल गाडय़ांचा प्रवास सुकर होणार आहे.

एमयुटीपी-२ बरोबरच एमयुटीपी ३ लाही २८३ कोटी ७८ लाख रुपये निधी मिळाला. एमयुटीपी-३ मधील दिघा स्थानकाचे काम व दोन स्थानकांमधील रुळ ओलांडण्याचे प्रकार रोखण्यासाठी विविध उपाययोजनांचे कामेच सुरू झाली आहेत. प्रकल्पाचा खर्च हा १० हजार ९४७ कोटी रुपये आहे. जागतिक बॅंकेकडून आर्थिक निधी मिळण्यास आलेल्या अडचणी आणि त्यामुळे अन्य बॅंका व संस्थांशी एमआरव्हीसीने केलेली चर्चा यामुळे निधी वेळेत उपलब्ध होऊ शकला नाही.  एमयुटीपी ३ मध्ये पनवेल ते कर्जत दुहेरी मार्ग, विरार ते डहाणू चौपदरीकरण, ऐरोली ते कळवा लिंक रोड, ४७ वातानुकूलित लोकल या प्रकल्पांचा समावेश आहे. निधी मिळाल्याने काही प्रमाणात का होईना प्रकल्पाची कामे पुढे सरकतील. ५४ हजार कोटी रुपयांच्या एमयुटीपी-३ ए साठी ५० कोटी रुपयेही मिळाले आहेत. यात काही प्रमाणात किरकोळ कामे केली जातील, अशी माहिती देण्यात आली. सध्या एमयुटीपी-३ ए कॅबिनेटमध्ये अंतिम मंजुरीसाठी आहे. त्याआधीच निधी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अर्थसंकल्पातून मिळालेल्या निधीवर आम्ही समाधानी आहोत. त्यामुळे प्रकल्पांच्या कामांना गती मिळेल. जेवढा निधी अर्थसंकल्पात मिळाला आहे, तेवढाच निधी राज्य सरकारकडून मिळेल.   – रवी शंकर खुराना, अध्यक्ष, एमआरव्हीसी

Story img Loader