लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : भविष्याची पावले ओळखून वर्तमानात त्यादृष्टीने कार्यप्रवृत्त झालेल्या, बुद्धीमत्ता आणि कल्पकता यांचा मेळ साधत आपापल्या क्षेत्रात रचनात्मक कार्य उभारणाऱ्या १८ द्रष्टय़ा तरुण तेजांकितांचा सन्मान केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आला. संशोधन असो वा प्रशासन, कला-मनोरंजन प्रत्येक क्षेत्रात अचंबित करायला लावतील, अशी यशोगाथा रचणाऱ्या युवा प्रज्ञावंतांचा गौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला.
कला, क्रीडा, मनोरंजन, साहित्य, प्रशासन, विज्ञान- तंत्रज्ञान, कायदा, नवउद्यमी, उद्योग अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्याने मापदंड निर्माण करणाऱ्या १८ प्रज्ञावंतांना शुक्रवारी ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात आले. लोअर परेल येथील सेंट रेजीस हॉटेलमध्ये केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयुष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा रंगला. या ‘तेजांकितांची’ निवड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पुरस्कार निवड समितीचे सदस्य आयआयटी, मुंबईचे प्राध्यापक डॉ. मिलिंद अत्रे, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक डॉ. मुक्ता पुणतांबेकर, प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, पीडब्ल्यूसीचे अल्पेश कांकरिया यांचा इंडियन एक्स्प्रेस समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
तरुणाईचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हिने आपल्या ओघवत्या निवेदन शैलीत हा पुरस्कार सोहळा बांधून ठेवला. ‘रिजॉइस’चे वैभव बाबाजी यांनी दृश्यफितींच्या संयोजनाची जबाबदारी सांभाळली. पुरस्कार विजेत्यांचा अल्प परिचय करून देणाऱ्या ध्वनी- दृश्यफितींसाठी ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधी रसिका मुळय़े यांचा आवाज लाभला होता, तर संहिता लेखन ‘लोकसत्ता’चे चिन्मय पाटणकर यांनी केले.
हेही वाचा >>>‘राज्यातील दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष’
विविध क्षेत्रात प्रतिभावंत तरुणांचे मोठय़ा प्रमाणावर काम सुरु आहे त्यांचे हे काम लोकांपुढे आणावे या हेतूने हा उपक्रम सहा वर्षांपूर्वी सुरु केला होता. साधारणपणे पुरस्कार मिळणाऱ्यांनाच पुरस्कार मिळतात अशी परिस्थिती आजूबाजूला असताना नवोदितांचा सत्कार करण्याचा हा उपक्रम सुरु केला आणि गेल्या सहा वर्षांत प्रातिभावंतांची रांग लागली. दरवर्षी या पुरस्कारासाठी साडेचारशे ते पाचशे अर्ज येतात. त्यातून छाननी आणि मूल्यमापन करून ४० ते ५० जणांचे नामांकन होते. त्यातून निवड समिती १७ ते १८ जणांची निवड करत असते. लोकसत्ताचा या निवड प्रक्रियेत सहभाग हा नाममात्र असतो. गेल्या सहा वर्षांत आतापर्यंत निवडलेल्या तरुण तेजांकिताचा त्यांच्या क्षेत्रातील पुढचा प्रवास बघताना खूप अभिमान वाटतो, आशा भावना लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी प्रास्ताविकात व्यक्त केल्या.
लोकसत्ता तरुण तेजांकित- २०२३
’ अतुल कुलकर्णी – कायदा व धोरण
’ राहुल कर्डिले – कायदा व धोरण
’ नेहा पंचमिया – सामाजिक
’ विवेक तमाईचिकर – सामाजिक
’ राजू केंद्रे – सामाजिक
’ सूरज एंगडे – सामाजिक, साहित्य
’ सायली मराठे – उद्योग
’ अनंत इखार – उद्योग
’ निषाद बागवडे – नवउद्यमी
’ रुतिका वाळंबे – नवउद्यमी
’ अभिषेक ठावरे – क्रीडा
’ ओजस देवतळे – क्रीडा
’ दिव्या देशमुख – क्रीडा
’ ज्ञानेश्वर जाधवर – कला
’ प्रियांका बर्वे – मनोरंजन
’ वरुण नार्वेकर – मनोरंजन
’ हेमंत ढोमे – मनोरंजन
’ प्रिया बापट – मनोरंजन
मुख्य प्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
सहप्रायोजक :सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. ल्लग्रॅव्हीटस फॉउंडेशन ,पीएनजी ज्वेलर्स ,महानिर्मिती ,केसरी टूर्स ल्लसिडको महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ,रिजन्सी ग्रुप
सहाय्य :वैभवलक्ष्मी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स
पॉवर्ड बाय :कमांडर वॉटरटेक प्रायव्हेट लिमिटेड ,लक्ष्य अकॅडमी
नॉलेज पार्टनर : प्राइस वॉटरहाऊस कूपर्स