मुंबई : १९ व्या दशकापासून कलेचा वारसा जपणारे जे.जे. स्कूल ऑफ आर्टने आपली ही परंपरा भविष्यात अशीच कायम ठेवावी. विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर जे.जे. स्कूलने प्रमाणपत्र देणारी संस्था न बनता सेंटर ऑफ ग्लोबल एक्सलेन्स आणि संशोधन करणारी संस्था बनावी, असे केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेद्र प्रधान जे.जे. स्कूल ऑफ आर्टला ‘डी नोव्हो’ दर्जा देताना म्हणाले.
कलेच्या शिक्षणात अव्वल असलेल्या मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्टला गुरुवारी धर्मेद्र प्रधान यांनी ‘डी नोव्हो’ विद्यापीठाचा दर्जा बहाल केला. त्यामुळे सर ज.जी. कला, वास्तूकला व उपयोजित कला महाविद्यालयाऐवजी आता सर ज.जी. कला, वास्तूकला व अभिकल्प विद्यापीठ या नावाने ओळखले जाणार आहे.
हेही वाचा >>> ‘पुण्यात हिंसाचारासाठी गोऱ्हे, नार्वेकरांची चिथावणी’; मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
जे.जे. स्कूल ऑफ आर्टला विद्यापीठाचा दर्जा आता मिळाला आहे. त्यामुळे अनेक नव्या सुविधा विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना मिळतील. नव्या सुविधा मिळणार असल्या तरी जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे मूळ चरित्र बदलता कामा नये. देशातील कला क्षेत्रात जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे योगदान उल्लेखनीय आहे. जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी देशविदेशात नावलौकिक मिळवलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या विद्यापीठाने आपला अभ्यासक्रम निश्चित करून अन्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना कलेचा अभ्यास करता येईल यावर लक्ष केंद्रित करावे, असे धर्मेद्र प्रधान यांनी सांगितले. देशातील तरुणांमधील कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे] असेही प्रधान म्हणाले.