मुंबई : संघराज्य संकल्पना आणि कार्यप्रणालीवर भाजपचा दृढविश्वास असून सर्व राज्यांच्या सहमतीनंतरच अनेक निर्णय घेण्यात आले आहेत, असे ठाम प्रतिपादन केंद्रीय वने आणि पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी सोमवारी केले. एकेकाळी राजकीय अस्पृश्य असलेला भाजप आज सर्वसमावेशक आणि सर्वात मोठा राष्ट्रीय विचारप्रणालीचा पक्ष झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भूपेंद्र यादव आणि केंद्र सरकारच्या माजी प्रमुख आर्थिक सल्लागार डॉ. इला पटनाईक यांनी भाजपच्या  राजकीय वाटचालीचे, महत्त्वांच्या टप्प्यांचे आणि आर्थिक धोरणांचे समग्र विवेचन ‘द राईज ऑफ द बीजेपी’ पुस्तकात केले आहे. ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’तर्फे या पुस्तकावर चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर होते आणि ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर चर्चेत सहभागी झाले होते.

संघराज्य मुद्दय़ावर विवेचन करताना भूपेंद्र यादव म्हणाले की, संघराज्य प्रणाली आणि राज्यांच्या अधिकारांबाबत आम्ही सजग असल्यानेच सत्तेवर आल्यावर केंद्रीय नियोजन आयोग बरखास्त केला.  वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणालीबाबत सर्व राज्यांशी चर्चा करून आणि सहमती घडवून ती देशभर लागू करण्यात आली. केंद्र आणि राज्यांचे अर्थमंत्री जीएसटी मंडळात सर्व सहमतीने किंवा मतदानाने कराबाबतचे निर्णय घेतात. भाजपने सुरुवातीला जीएसटीला विरोध केला होता. केंद्राकडून राज्यांची देणी वेळेवर मिळत नव्हती आणि जीएसटी भरपाईबाबत काँग्रेस नेतृत्वाखालील केंद्र सरकार काहीच सांगत नव्हते. पण पंतप्रधान मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्यावर राज्यांना पाच वर्षे वेळेवर आणि नियमित भरपाई दिली जाईल, यासह अनेक निर्णय घेऊन सहमती घडवून  जीएसटी प्रणाली लागू  केली.

भाजप व केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा आढावा घेताना डॉ. पटनाईक म्हणाल्या, जीएसटी प्रणाली लागू करून राज्यांना आर्थिक अधिकार देण्यात आले असून एखाद्या वस्तूवर करआकारणीबाबतचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री घेत नाहीत, तर सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांकडून घेतला जातो. हे केंद्राचे अधिकारांचे राज्यांकडे विकेंद्रीकरणच आहे.

माजी मंत्री जावडेकर म्हणाले, ‘‘सर्व नागरिक समान आहेत, हीच भाजपची भूमिका आहे. त्यामुळे हिजाब हा गणवेशाबाबतचा मुद्दा असून न्यायालयाने निर्णय द्यावा. 

द राईज ऑफ द बीजेपी

या पुस्तकात भाजपची जनसंघापासूनची वाटचाल, पंडित दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे विचार, आणीबाणीतील काही मुद्दे, भाजपची पहिल्यांदा सत्ता, रालोआची सरकारे आणि स्थित्यंतरे, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन वेळा सत्ता मिळणे, इथपर्यंतच्या भाजपच्या वाटचालीचा धांडोळा या पुस्तकात घेतला असल्याचे भूपेंद्र यादव यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union environment minister bhupender yadav discussion on book the rise of the bjp zws