मुंबई : वैद्यकीय व्यावसायिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत दरवर्षी १५ हजारांनी वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत देशात ७५ हजार वैद्यकीय जागा वाढवण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी नुकतेच जाहीर केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा झालेल्या नीट यूजी परीक्षेसाठी देशभरातून २४ लाख ६ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परंतु वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागा फारच अपुऱ्या आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहावे लागले. जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमानुसार लोकसंख्या व डॉक्टरांची संख्या हे गुणोत्तर राखण्यासाठी केंद्र सरकारने पुढील पाच वर्षांत देशात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ७५ हजार जागा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मागील चार वर्षांत पदवी अभ्यासक्रम आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा २५ हजारांनी वाढवल्या आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमाला असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने दरवर्षी १५ हजार जागा वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार पुढील पाच वर्षांत वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या ७५ हजार जागा वाढविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी दिली.

हेही वाचा : Mumbai Rain Red Alert : मुंबईत मुसळधार पाऊस; रस्त्यांना नद्यांचं रुप, रेल्वेची उशिराने धाव, प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी!

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात २०२३ – २४ मध्ये वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ७०६ होती, ती २०२४-२५ मध्ये ७६६ झाली आहे. २०१३-१४ च्या तुलनेत आतापर्यंत महाविद्यालयांच्या संख्येत ९८ टक्के वाढ झाली आहे. सध्या देशात ४२३ सरकारी आणि ३४३ खाजगी अशी एकूण ७६६ वैद्यकीय महाविद्यालये आहेत.

हेही वाचा : मुंबई विद्यापीठ परिसरात पूर्वपरवानगीशिवाय आंदोलनास बंदी, विद्यार्थी संघटनांकडून निषेध, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

सध्या किती जागा…

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या, म्हणजेच एमबीबीएसच्या, २०२३-२४ मध्ये १ लाख ८ हजार ९४० जागा होत्या. त्या २०२४-२५ मध्ये १ लाख १५ हजार ८१२ पर्यंत वाढल्या आहेत. २०१३ – १४ मध्ये देशात ५१ हजार ३४८ वैद्यकीय जागा होत्या आणि गेल्या १० वर्षात त्यामध्ये ६४ हजार ४६४ म्हणजेच १२५ टक्के वाढ झाली. वैद्यकीय पदव्युत्तर जागा २०२३-२४ मध्ये ६९ हजार २४ वरून २०२४-२५ मध्ये ७३ हजार १११ पर्यंत वाढल्या आहेत. २०१३-१४ मध्ये ३१ हजार १८५ जागा होत्या. पदव्युत्तर जागांची संख्या ३९ हजार ४६० म्हणजेच १२७ टक्क्यांनी वाढली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union health minister jp nadda 75000 new medical seats in next 5 years mumbai print news css