Narayan Rane Admitted to Lilavati Hospital: केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे रुग्णालयात दाखल झाले आहेत. नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नारायण राणे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. नारायण राणे यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. त्यांना दोन दिवस विश्रांतीसाठी रुग्णालयात ठेवलं जाऊ शकतं.
मिळालेल्या माहितीनुसार, नारायण राणे नियमित तपासणीसाठी लिलावती रुग्णालयात आले होते. यावेळी अँजिओग्राफी करण्यात आली असता काही ब्लॉक आढळले. यानंतर शुक्रवारी साकळी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. डॉक्टर मॅथ्यू यांनी ही अँजिओप्लास्टी केल्याचं रुग्णालयाने इंडियन एक्स्पेसशी बोलताना सांगितलं आहे. नारायण राणे यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना दोन दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
लिलावती रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, नारायण राणे यांना दोन स्टेंट्सची (हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमण्या आणि रक्तवाहिन्या दाबल्या जाऊ नये म्हणून बसवला जाणार जाळीसारखा छोटा गोलाकार तुकडा) गरज असून यामधील एक बसवण्यात आला आहे. तर दुसरा स्टेंट नंतर बसवण्यात येणार आहे.
नारायण राणेंवर अँजिओप्लास्टी होण्याची ही पहिली वेळ नाही. २००९ मध्ये रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे नारायण राणेंच्या छातीत दुखत होतं. यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यावेळीही नारायण राणे वांद्रे येथील लिलावती रुग्णालयातच दाखल झाले होते.