मुंबई : आपल्याला सार्वजनिक जीवनात काम करताना आत्मविश्वास जरूर असावा, मात्र अहंकार बाळगू नये, असे परखड मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार वितरण समारंभात सोमवारी येथे केले. विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवलेल्या ‘तरुण तेजांकितां’चा गुणगौरव गडकरी यांच्या हस्ते एका दिमाखदार समारंभात करण्यात आला. यावेळी आपल्या प्रदीर्घ राजकीय व सामाजिक वाटचालीत आलेले अनुभव कथन करत गडकरी यांनी या तरुणांच्या कार्याचे कौतुक केले.

लढाईत हरणारा नव्हे, तर रणांगण सोडून जाणारा संपुष्टात येतो. त्यामुळे जीवनात कोणत्याही क्षेत्रात काम करताना संघर्ष करूनच यशाचे शिखर गाठता येते. पुरस्कार मिळाल्यावर किंवा आपल्या कर्तृत्वाचा गौरव झाल्यावरही त्यावर संतुष्ट न राहता अविरतपणे आपली वाटचाल सुरू ठेवावी, असा सल्लाही गडकरी यांनी दिला.हा केवळ या ‘तरुण तेजांकित’ मान्यवरांचा गौरव नसून त्यातून समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रेरणाही मिळते, असे गडकरी यांनी आवर्जून नमूद केले.

सरकारमध्ये चांगल्या कामाचे कौतुक किंवा सन्मान होत नाही व वाईट काम करणाऱ्यांना शिक्षा होत नाही, असे सांगून गडकरी म्हणाले, ‘जीवनात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कौशल्य व मेहनत महत्त्वाची असून शॉर्टकट घेऊन चालत नाही. कोणत्याही क्षेत्रात काम करताना केवळ अडचणी सांगून चालत नाही, तर काहीही करून त्या मी सोडवीन, अशी जबर इच्छाशक्ती ठेवून काम करावे लागते. तरच यशाचे शिखर गाठता येते.’

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार विजेत्यांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सारस्वत को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे गौतम ठाकूर, केसरी टूर्स शैलेश पाटील, वैभव डेव्हलपर्सचे डॉ. रामदास सांगळे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अविनाश ढाकणे.

लोकसत्ता’चा पुरस्कार विश्वासार्ह

‘लोकसत्ता’ने समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर परीक्षकांकडून अतिशय निरपेक्ष व चोखंदळपणे या पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे. ‘लोकसत्ता’ व ‘इंडियन एक्स्प्रेस’ समूह, त्याचबरोबर मान्यवर परीक्षकांची विश्वासार्हता मोठी आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.

आपल्या कर्तृत्वाचा गौरव झाल्यावरही त्यावर संतुष्ट न राहता विजेत्यांनी अविरतपणे आपली वाटचाल सुरू ठेवावी. जीवनात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कौशल्य व मेहनत महत्त्वाची असून शॉर्टकट काढून चालत नाही. नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री