मुंबई : आरोग्या संबंधीच्या केंद्राच्या योजना राज्यात राबविण्याच्या नावाखाली केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी थेट राज्य रक्त संक्रमण परिषदेचे कार्यालय बळकावले आहे. परिषदेच्या संचालकांच्या कक्षाबरोबरच अन्य काही कक्ष जाधव यांच्या पदाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत. तसेच मंत्र्यांच्या कार्यालयासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेचे कार्यालय अन्यत्र हलविण्याचा घाट घालण्यात येत आहे. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या थॅलेसेमिया, हिमोफेलिया आणि सिकलसेलच्या रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. तसेच परिषदेच्या कामाकाजावरही परिणाम होणार असल्याचे परिषदेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा >>> मुदतठेवींमध्ये १० हजार कोटींची घट; पालिकेचा राखीव निधी ९१ हजार कोटींवरून ८१ हजार कोटींवर
राज्यातील रक्ताचा साठा आणि रक्तपेढ्या यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २० वर्षांपूर्वी राज्य रक्त संक्रमण परिषद या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानुसार चर्चगेट येथील रवींद्र अॅनेक्स या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर जागा भाड्याने घेऊन परिषदेचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे. मात्र, कोणताही शासकीय आदेश नसताना मागील दोन आठवड्यापासून केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी परिषदेतील दोन कक्ष ताब्यात घेतले आहेत.
केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी…
केंद्र सरकाच्या आरोग्य योजनांची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी व त्यासाठीचा अधिकाधिक निधी राज्याला मिळावा यासाठी तसेच राज्याचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे योग्यरितीने पाठविण्यासाठी आरोग्य विभागाकडे जागा मागितली होती. त्यानुसार राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या कार्यालयातील दोन कक्ष विभागाने दिले आहेत. मात्र ते लहान असल्याने तेथे काम करणे शक्य नाही. तसेच बैठकाही घेता येणार नाहीत. त्यामुळे मोठी जागा देण्याची मागणी आरोग्य विभागाकडे केली आहे.