मुंबईतल्या ट्रॅफिक जामचा फटका बसला नाही असा माणूस शोधावाच लागेल. अशात आता केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनाही ट्रॅफिक जामचा फटका बसला आहे. त्यांना या ट्रॅफिकमुळे पायपीट करत कार्यक्रम स्थळी पोहचावं लागलं आणि त्यांना उशीर झाल्याने हा कार्यक्रम साडेसहाऐवजी दीड तास उशीरा म्हणजे जवळपास आठ वाजण्याच्या सुमारास सुरु झाला.
केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्य जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी मुंबईत आले होते. मुंबईतील बांद्रा या ठिकाणी असलेल्या रंगशारदा सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अटलजींच्या कवितांचं ब्रेल लिपीत भाषांतर करण्यात आलं. तसेच अटलजींच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सुरेश प्रभूंना पोहचायचं होतं. मात्र प्रभू यांची कार ट्रॅफिकमध्ये अडकली. अर्धा तास झाला तरीही कार पुढे सरकेचना. शेवटी प्रभू यांनी आपली सरकारी कार सी लिंकवर सोडून पायी जाण्याचा निर्णय घेतला.
साधारण वीस मिनटांची पायपीट केल्यावर सुरेश प्रभू यांना रंगशारदा गाठता आलं. साडेसहाला सुरु होणाऱ्या कार्यक्रमाला उशीर झालाच होता. सुरेश प्रभू या कार्यक्रमाला पोहचेपर्यंत रात्रीचे आठ वाजले. या कार्यक्रमात सुरेश प्रभू जेव्हा बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हाच त्यांनी उपस्थितांची माफी मागितली आणि मुंबईतील ट्रॅफिक जॅमचा किस्सा श्रोत्यांना सांगितला.