फळांचा राजा म्हणून आंब्याची ओळख आहे. आंबा म्हंटलं की, कोकणच्या अस्सल हापूस आंब्याचं नाव सर्वप्रथम नजरेसमोर येतं. पण हापूससह रत्ना, पायरी, निलम अशा तब्बल ३२ जातींचे कोकणातील आंबे एकाच ठिकाणी पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळाली आहे. गोडसर, केशरी-पिवळसर रंगाच्या आंब्याच्या लागवडीसाठी कोकणची माती, हवा कशाप्रकारे अनुकूल आहे, याची माहिती मिळेल. ‘ग्लोबल कोकण’ आणि ‘कोकण भूमी’ प्रतिष्ठानतर्फे पुढाकार घेत ’मँगो फ्ली’ उपक्रमांतर्गत घाटकोपर येथील आरसिटी मॉलमध्ये १ मे दरम्यान या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणच्या शेतातून ते थेट ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध असणार्या हापूसची ग्राहकांना खरेदी करता येईल.
”हापूस आंब्याचा ’लोकल ते ग्लोबल’ ब्रँड विकसित करत शेतकऱ्यांना व्रिकीसाठी नवीन व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असून मॉल्स, महामार्ग, लोकल बाजार ते परदेशात आंबा विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.” असे ’कोकण भूमी प्रतिष्ठान’चे संस्थापक संजय यादवराव म्हणाले. संस्थापक निलेश सांबरे यांच्या ’जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणीक संघटने’चे या उपक्रमाला सहकार्य लाभले असून पालघरमधील आदिवासी माहिला यंदा शेतकर्यांना आंबा विक्रीसाठी मदत करणार आहेत.
१ मे रोजी शेतकरी आंबा बाजार
१ मे रोजी हिरानंदानी ईस्टेट, मॅकडॉनल्ड जवळ टीएमसी ग्राऊंडमध्ये ‘शेतकरी आंबा बाजार’चे आयोजन करण्यात येणार आहे. जिथे ग्राहकांना नैसर्गिकरित्या पिकवलेल्या अस्सल हापूस आंब्याची खरेदी करता येईल. हा आंबा बाजार ३१ मे पर्यंत सुरु राहील.