मुंबई : रंगमंचावर लख्ख प्रकाश… सभागृहात मात्र गुडूप अंधार… प्रयत्नपूर्वक पाठ केलेले संवाद धैर्य एकवटून केलेला प्रवेश… अन् क्षणार्धात टाळ्यांचा कडकडाट हे चित्र होते ‘एक ऐसे गगन के तले’ या उपक्रमाअंतर्गतील नाट्य प्रयोगाचे. डोंगरी बालसुधारगृहातील १५ ते २० वयोगटातील १९ मुलांनी केलेला हा पहिला नाट्यप्रयोग.
आशियाना कम्युनिटीज फाऊंडेशन यांच्या नेतृत्वाखाली ‘एक ऐसे गगन के तले’ या उपक्रमाअंतर्गत बादल सरकार यांच्या ‘बियॉन्ड द लँड ऑफ हट्टमाला’ या काल्पनिक आणि विनोदी नाटकावर आधारित सपन सरन यांनी रूपांतरित केलेले आणि दिग्दर्शित केलेले नाटक. जे नाटक सादर करण्याची संधी डोंगरी बालसुधारगृहातील मुलांना मिळाली.
या नाटकाचा प्रयोग नुकताच मुंबईत पार पडला. डोंगरी बालसुधारगृहातील १९ मुलांनी हे नाटक सादर केले. यापैकी एकाही मुलाला यापूर्वी नाटकात काम केल्याचा अनुभव नव्हता. या मुलांना मागील तीन महिन्यांपासून प्रशिक्षण देण्यात येत होते. प्रशिक्षणादरम्यान त्यांच्याकडून संवाद पाठ करून घेणे, भाषा आदी बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात येत होते. यासाठी नाट्य दिग्दर्शिका तिमिरा आणि आशियानाचे संचालक सची मनियार यांनी विशेष मेहनत घेतली.
बालसुधारगृहातील मुलांना अभिनयाअगोदर भाषा, वाचन या गोष्टी शिकवणे गरजेचे होते. या मुलांनी शिक्षणच घेतले नसल्याने त्यांना भाषेचे ज्ञान नव्हते. यामुळे पहिली सुरुवात तिथून केली. त्यानंतर नाटकातील संवाद बोलून, ते रेकॉर्ड करून त्यांना सतत ऐकवण्यात येत होते. यामुळे मुलांना ते समजणे आणि आत्मसात करणे सोपे झाले, असे तिमिरा यांनी सांगितले. रंगमंचावर सादरीकरण कसे करावे, संवाद कसे म्हणावेत याबरोबरच प्रकाशयोजना, संगीत, नेपथ्य याबाबतची सविस्तर माहितीही त्यांना देण्यात आली. तसेच केवळ रंगमंचावर काम करणे पुरेसे नसून त्याअनुषंगाने लागणाऱ्या विविध गोष्टींची तोंडओळख मुलांना करून देण्यात आली.
मुलांचा अभिनय सुखदायक
बालसुधारगृहातील मुलांना ‘अभिनेता’ म्हणून पाहणे हे सर्वात सुखदायक होते. मागील तीन महिन्यांपासून या मुलांनी मेहनत घेतली आहे. नाटक सादर करताना या मुलांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद दिसत होता. एक प्रेक्षक म्हणून आम्हीही भारावून गेलो. मुलांमधील आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता, असे आशियाना कम्युनिटीज फाऊंडेशनच्या साची यांनी सांगितले.
नाटकातून काही तरी चांगलं काम केले
या नाटकात काम करणारा वीर म्हणाला की, मी याआधी वाईट काम केल्यामुळे मला वाईटच समजतात आणि हे मला मान्य आहे. मात्र, या नाटकात मी चांगले काम केले आहे. ही चांगली गोष्ट नेहमीच माझ्या लक्षात राहील. या एका संधीमुळे भविष्यात माझ्या कलागुणांना वाव मिळेल.
पुढील प्रयोग एप्रिलमध्ये
या नाटकाचा पुढील प्रयोग एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पृथ्वी थिएटरमध्ये होणार आहे. यामुळे मुलांना पुन्हा एकदा त्यांचे अभिनय कौशल्य दाखविण्याची संधी प्राप्त होणार आहे.