पावसाने ओढ दिल्याने उन्हाची काहिली वाढत असताना राज्यातील वीजपुरवठय़ाचा गोंधळ पुन्हा सुरू झाला आहे. वीजप्रकल्प बंद पडत असताना बाजारपेठेतून वीज उपलब्ध होत नसल्याने सुमारे दोन हजार मेगावॉटची तूट निर्माण होऊन राज्यात सर्वत्र दोन ते पाच तासांचे भारनियमन सुरू झाले आहे. परिणामी आधीच उन्हाचा त्रास आणि त्यात भारनियमनाचा जाच अशी अवस्था झाली आहे.
‘अदानी पॉवर’च्या तिरोडा येथील वीजप्रकल्पातील ६६० मेगावॉटचा संच तांत्रिक कारणामुळे पुन्हा बंद पडला आहे. तशात प्रतियुनिट ४.५० रुपये दर देऊनही बाजारपेठेतून अपेक्षित असलेली एक हजार मेगावॉट वीज मिळू शकली नाही. पावसाला विलंब असल्याने कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी पाणी वापरण्यात अडचण आहे. त्यामुळे मंगळवारपासून राज्यात सुमारे दोन हजार मेगावॉटची तूट निर्माण झाल्याने राज्यभरात दोन ते पाच तासांचे भारनियमन सुरू करण्यात आले आहे. आणखी दोन ते तीन दिवस भारनियमनाचा जाच सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत.
मागच्या आठवडय़ातही वीजप्रकल्प बंद पडल्याने तीन ते सहा तासांचे भारनियमन सुरू झाले होते. परिस्थिती पूर्ववत होत असतानाच मंगळवारी पुन्हा तोच गोंधळ नव्याने सुरू झाला आहे. आता बुधवारसाठी सुमारे ८०० मेगावॉट वीज मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

..त्या वायूतून २०० मेगावॉट वीजनिर्मिती
केंद्र सरकारने दाभोळ प्रकल्पासाठी दिलेला ०.९ दशलक्ष घनमीटर प्रतिदिन इतका वायू दिल्लीतील वीजसंकट दूर करण्यासाठी तिकडे वळवला असला तरी सद्यस्थितीत त्याचा काहीही फटका महाराष्ट्राला बसत नाही. कारण गेल्या वर्षभरापासून दाभोळ प्रकल्प बंद पडलेला आहे. हा वायू दाभोळसाठी असला तरी प्रत्यक्षात तो मिळून दाभोळमधून वीजनिर्मिती होत नव्हती. त्यामुळे हा वायू दिल्लीसाठी वळवला तरी आताच्या परिस्थिती महाराष्ट्राला त्याचा त्रास होणार नाही, असे ऊर्जा विभागातील सूत्रांनी सांगितले.