पावसाने ओढ दिल्याने उन्हाची काहिली वाढत असताना राज्यातील वीजपुरवठय़ाचा गोंधळ पुन्हा सुरू झाला आहे. वीजप्रकल्प बंद पडत असताना बाजारपेठेतून वीज उपलब्ध होत नसल्याने सुमारे दोन हजार मेगावॉटची तूट निर्माण होऊन राज्यात सर्वत्र दोन ते पाच तासांचे भारनियमन सुरू झाले आहे. परिणामी आधीच उन्हाचा त्रास आणि त्यात भारनियमनाचा जाच अशी अवस्था झाली आहे.
‘अदानी पॉवर’च्या तिरोडा येथील वीजप्रकल्पातील ६६० मेगावॉटचा संच तांत्रिक कारणामुळे पुन्हा बंद पडला आहे. तशात प्रतियुनिट ४.५० रुपये दर देऊनही बाजारपेठेतून अपेक्षित असलेली एक हजार मेगावॉट वीज मिळू शकली नाही. पावसाला विलंब असल्याने कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी पाणी वापरण्यात अडचण आहे. त्यामुळे मंगळवारपासून राज्यात सुमारे दोन हजार मेगावॉटची तूट निर्माण झाल्याने राज्यभरात दोन ते पाच तासांचे भारनियमन सुरू करण्यात आले आहे. आणखी दोन ते तीन दिवस भारनियमनाचा जाच सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत.
मागच्या आठवडय़ातही वीजप्रकल्प बंद पडल्याने तीन ते सहा तासांचे भारनियमन सुरू झाले होते. परिस्थिती पूर्ववत होत असतानाच मंगळवारी पुन्हा तोच गोंधळ नव्याने सुरू झाला आहे. आता बुधवारसाठी सुमारे ८०० मेगावॉट वीज मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा