मुंबई : राज्यातील विविध विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयांमध्ये तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश दिला जातो. या प्रवेश प्रक्रियेला ३० एप्रिलपासून सुरूवात करण्यात येणार आहे. पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेता यावा यासाठी कृषी महाविद्यालयांमध्ये १० टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. गतवर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या या प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांतर्गत तीन वर्षाच्या इंग्रजी माध्यमातील कृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गतवर्षीपासून प्रथमच पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश देण्यास सुरूवात झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून राबविण्यात येते. त्यानुसार यंदा या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज नोंदणी करण्याच्या प्रक्रियेला ३० एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी महाविद्यालयातील थेट पदवीच्या द्वितीय वर्षाला प्रवेश मिळावा यासाठी महाविद्यालयातील एकूण जागांपैकी १० टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. राज्यामध्ये चार कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयांमध्ये गतवर्षी जवळपास १८ हजार जागा होत्या. यापैकी १० टक्के जागा विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक वर्षी जागांमध्ये होणारी वाढ व घट यानुसार राखीव जागांचे प्रमाण बदलते.
प्रवेशासाठी आवश्यक पात्रता
कृषी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याने इंग्रजी माध्यमातील कृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गासाठी किमान ६.० एकत्रित श्रेयांक सरासरी गुणासह उत्तीर्ण व आरक्षित प्रवर्गासाठी किमान ५.० एकत्रित श्रेयांक सरासरी गुणासह (सीजीपीए) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्रवेश प्रक्रिया कशी असेल
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानंतर संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येते. या यादीसंदर्भातील काही तक्रार असल्यास त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येतात. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरल्यानंतर पहिल्या फेरीसाठीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर शिल्लक राहिलेल्या जागांसाठी पुन्हा महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरता येणार आहे. त्यानंतर दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. दोन फेऱ्या झाल्यानंतर महाविद्यालयनिहाय, प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर महाविद्यालय स्तरावर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.