|| नीलेश अडसूळ
वर्षातून केवळ चार वेळा राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय
मुंबई : देशातील विद्यापीठांमध्ये सर्वात उंच ध्वजस्तंभ उभारण्याचा मान मिळवणाऱ्या मुंबईत विद्यापीठातील १५० फुटी ध्वजस्तंभ आता राष्ट्रध्वजाविनाच दिसणार आहे. वर्षातील ३६५ दिवस तिरंगा फडकवण्याच्या उद्देशाने हा ध्वजस्तंभ उभारण्यात आला होता. परंतु वाहत्या वाऱ्यांमुळे ध्वजाचे कापड वारंवार फाटत आहे. राष्ट्रध्वजाच्या पावित्र्याला धक्का लागू नये म्हणून विद्यापीठाने वर्षातील केवळ चार दिवसांचे औचित्य साधून ध्वजस्थंभावर राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई विद्यापीठाने २०१६ च्या दरम्यान कलिना संकुल येथे १५० फूट उंच ध्वजस्तंभ उभारला होता. अनेकजण हा राष्ट्रध्वज पाहण्यासाठी विद्यापीठात जात होते. २०१८ मध्ये जवळपास १० महिन्यांहून अधिक काळ या ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वनज नव्हता. त्यामुळे अधिसभा सदस्यां याबाबत आक्षेप घेतला होता. त्यानंतर ध्वजस्तंभावर पुन्हा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. त्यावेळी वाऱ्यामुळे राष्ट्रध्वजाचे कापड वारंवार फाटत असल्याचे कारण विद्यापीठाने दिले होते. करोनाकाळ सुरू झाल्यापासून या ध्वजस्तंभाकडे कोणाचेही लक्ष गेलेले नाही. जवळपास दोन वर्षांहून अधिक काळ या ध्वजस्तंभांवर राष्ट्रध्वज नाही. याबाबत विद्यापीठाकडे चौकशी केली असता, आता हा राष्ट्रध्वज ३६५ दिवस फडकणार नसल्याची बाब समोर आली. ध्वजस्तंभाची उंची, राष्ट्र ध्वजाच्या कापडाची भव्यता आणि वाऱ्याचा वेग यामुळे चार ते पाच दिवसातच कापड फाटत असल्याची माहिती विद्यापीठाने दिली. फाटका ध्वज फडकवल्याने राष्ट्रध्वजाचा अपमान होतो. त्याचे पावित्र्य राखणे आपली जबाबदारी असल्याने ३६५ दिवसांऐवजी वर्षातील चार महत्वाच्या दिवशी राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
थोडा इतिहास
मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या संकल्पनेतून २०१६ मध्ये हा ध्वजस्तंभ उभारण्यात आला. १८ जुलै २०१६ रोजी तेव्हाचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाच्या १६० व्या वर्षानिमित्त या ध्वजस्तंभावर तिरंगा फडकवण्यात आला. वर्षातील ३६५ दिवस २४ तास तो फडकत राहावा या उद्देशाने ध्वजस्तंभाची उभारणी करण्यात आली होती. या ध्वजस्तंभाची उंची १५० फूट असून त्यावर ३०/ ५० फूट आकाराचा भव्य राष्ट्रध्वज फडकवण्यात येतो. इतका भव्य राष्ट्रध्वज फडकावणारे मुंबई विद्यापीठ हे त्यावेळी देशातील पहिले विद्यापीठ ठरले होते.
राष्ट्रध्वज फडकवण्याइतकेच त्याचे पावित्र्य राखणे ही महत्त्वाची बाब आहे. वाऱ्यामुळे वारंवार राष्ट्रध्वज फाटत असल्याने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन, १ मे महाराष्ट्र दिन आणि १८ जुलै विद्यापीठ स्थापना दिन या चार महत्त्वाच्या दिवशी विद्यापीठातील उंच ध्वजस्तंभावर तिरंगा फडकवला जाईल. – सुधीर पुराणिक, कुलसचिव, मुंबई विद्यापीठ.
ध्वजस्तंभ उभारल्यानंतरचे वर्ष दीड वर्षे सोडले तर राष्ट्रध्वज अविरत फडकला नाही. केवळ काही औचित्यांवरच राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी हा ध्वजस्तंभ उभारला नव्हता. ध्वज वाऱ्यामुळे फाटत असेल तर त्याची डागडुजी करण्याची तसदी विद्यापीठाने घ्यायला हवी. त्यासाठी काही पैसे खर्च करायला हवेत. ध्वज फडकवण्याच्या निर्णयात आता बदल होत असेल तर ही गंभीर बाब आहे. ध्वजाबाबत येणाऱ्या अडचणींचा विचार करून ध्वजस्तंभ उभारायला हवा होता. विद्यापीठाने गाजावाजा करून तो ३६५ दिवस फडकेल अशी ग्वाही दिली होती. तर त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करायला हवे. – सुधाकर तांबोळी, अधिसभा सदस्य