नोकरीमध्ये तात्काळ बढती मिळविण्याच्या हव्यासापोठी रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष आत्माराम देव यांनी नियम धाब्यावर बसवून एकाच शैक्षणिक वर्षांत दोन पदव्या घेतल्याची तक्रार आहे. इतकेच नव्हे तर पीएचडी मिळण्याआधीच सेवा पुस्तिकेवर या पीएचडीची नोंदणी करून सेवाविषयक फायदे लाटल्याचा गंभीर आरोप डॉ. देव यांच्यावर आहे. या बाबी लक्षात आणून दिल्यानंतरही विद्यापीठ प्रशासनाने यावर कुठल्याही प्रकारची ठोस करावाई केल्याचे दिलस नाही.
डॉ. देव हे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. एकामागोमाग एक पेपर फुटल्यानंतर विद्यापीठाने डॉ. देव यांची परीक्षा विभागाच्या संचालक आणि समन्वयकपदी नियुक्ती करून त्यांच्याकडे विद्यापीठाच्या परीक्षांचा कारभार सोपविला. परीक्षा विभाग संचालक आणि समन्वयक अशा कोणत्याही पदाची विद्यापीठ कायद्यात तरतूद नसताना बेकायदेशीर पद्धतीने या पदांची निर्मिती करून डॉ. देव यांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती. नियम धुडकावून देव यांच्यावर या प्रकारे कृपादृष्टी ठेवणारे विद्यापीठ या तक्रारींना कितपत न्याय देईल असा प्रश्न आहे.
नियमानुसार एका शैक्षणिक वर्षांमध्ये एकच पदवी घेता येते. असे असताना देव यांनी १९८४- ८५ या एकाच शैक्षणिक वर्षांत वेगवेगळ्या विद्यापीठातून एम.ए. आणि एम.फील अशा दोन पदव्या घेतल्या. एकाच वेळेस दोन पदव्यांसाठी नोंदणी केलेल्या देव यांच्यांकडून मुंबई विद्यापीठाने किंवा कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने स्थलांतर प्रमाणपत्र का मागितले नाही, अशा प्रश्न आहे. विद्यापीठ कायदा एकाचवेळी दोन पदव्या देण्याची परवानगी देत नाही. अशावेळी दोन पदव्या घेण्यासाठी विद्यापीठाने देव यांना कुणाच्या मर्जीवरून सूट दिली, असा सवाल मुफ्था या प्राध्यापक संघटनेचे सचिव विजय पवार यांनी केला आहे. देव यांनी पीएचडी मिळण्याआधीच आपल्या सेवा पुस्तिकेवर पी.एच.डीची नोंदणी करून नंतर ती जाहीर केली, असा आरोपही पवार यांनी केला.
परीक्षा समन्वयक असे कुठलेही पद अस्तित्त्वात नसताना त्यांची त्या पदावर २०१२ साली नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या विरोधात काही तक्रारी झाल्यानंतर चार महिन्यांतच त्यांची त्या पदावरून उचलबांगडी करण्यात आली. विद्यापीठाच्या या गोंधळी कारभाराविरोधातही मुफ्था संघटनेचे सचिव विजय पवार यांनी राज्यपालांकडे तक्रार केली आहे. तक्रारीची दखल घेत राज्यपालांनी या प्रकरणाची योग्य चौकशी करण्याचे आदेश चार महिन्यापूर्वीच विद्यापीठाला दिले होते. पण विद्यापीठाने या तक्रारींची दखल घेऊन देव यांची चौकशी करण्याऐवजी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले आहे.
या संदर्भात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू नरेशचंद्र यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करू, असे सरकारी खाक्यातले उत्तर दिले.
मी घेतलेल्या पदव्या विविध विद्यापीठांच्या असून त्या अधिकृत आहेत. त्यामुळे माझ्यावर केले जाणारे आरोप हे पूर्वग्रह दूषित असून माझी सर्व ठिकाणी झालेली नियुक्ती नियमानुसार आहे, असा दावा डॉ. सुभाष देव यांनी केला.