शैक्षणिक अभ्यासक्रम आणि व्यावहारिक जीवनाची सांगड घालण्याच्या हेतूने नावीन्यपूर्ण आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांना चालना देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यानुसार कला, वाणिज्य, विज्ञान आदी पारंपरिक अभ्यासक्रमांऐवजी नावीन्यपूर्ण व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या नव्या संस्थांनाच यापुढे संलग्नता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
२०१४-१५ या शैक्षणिक वर्षांकरिता विद्यापीठाने तयार केलेल्या बृहद् आराखडय़ात ही शिफारस करण्यात आली आहे. आताच्या घडीला ६८३ महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्न आहेत. या महाविद्यालयांमध्ये २०१३-१४ या शैक्षणिक वर्षांत प्रथम वर्षांत झालेल्या सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थी नोंदणीचा आढावा घेतला असता नावीन्यपूर्ण व रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल असल्याचे स्पष्ट होते. उदाहरणार्थ, वाणिज्य शाखेपेक्षा ‘बीएमएम’सारख्या व विज्ञान शाखेच्या ‘प्राणिशास्त्र’ आणि ‘वनस्पतिशास्त्रा’ऐवजी ‘जैव तंत्रज्ञान’ या अभ्यासक्रमांच्या नोंदणीत वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षांत कम्युनिटी महाविद्यालये व नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम देणाऱ्या महाविद्यालयांनाच संलग्नता देण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, सरकारच्या मान्यतेनंतर या महाविद्यालयांना संलग्नता देण्यात येते.
नॅक मूल्यांकन बंधनकारक
अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयांच्या जादा तुकडय़ा अथवा नव्या अभ्यासक्रमांना मान्यता देण्यासाठीही विद्यापीठाने नॅक-एनबीए या शैक्षणिक संस्थांकडून मूल्यांकन करवून घेतलेल्या संस्थांचाच विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधात विद्यापीठाने याआधीच सर्व महाविद्यालयांना परिपत्रक पाठवून सूचना केल्या होत्या. आता या अटीचा बृहद् आराखडय़ात समावेश करून नॅक वा एनबीए मूल्यांकनाबाबत आपण आग्रही असल्याचे विद्यापीठाने दाखवून दिले आहे.
रोजगाराभिमुख अभ्यासक्रम देणाऱ्या महाविद्यालयांनाच परवानगी
शैक्षणिक अभ्यासक्रम आणि व्यावहारिक जीवनाची सांगड घालण्याच्या हेतूने नावीन्यपूर्ण आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांना चालना देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने एक पाऊल पुढे टाकले आहे.
First published on: 17-09-2013 at 01:44 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: University of mumbai give permission only for those institute who provide job oriented courses