मुंबई : स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे रंगलेल्या आंतरराष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करीत उपविजेतेपद पटकावले. मुंबई विद्यापीठाच्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई लॉ ॲकॅडमी’त (उमला) विधि शाखेचे शिक्षण घेणाऱ्या आर्या गौतम आणि संस्कृती शर्मा यांनी ‘जनरेटिव्ह एआय आणि कॉपीराइट कायदा’ या विषयावर उत्तम सादरीकरण करून जागतिक स्तरावर साओ पावलो विद्यापीठ आणि ओटावा विद्यापीठासारख्या इतर प्रतिष्ठित संस्थांना मागे टाकत उपविजेतेपदाचा बहुमान मिळवला.
तर दिल्लीतील राष्ट्रीय विधि विद्यापीठाने विजेतेपदाला गवसणी घातली. या आंतरराष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेत कॅनडा, ब्राझील, स्वीडन, इंग्लंड, मेक्सिको, साऊथ आफ्रिका आणि फ्रान्स या देशांतील १२ संघ सहभागी झाले होते.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनायटेड नेशन) वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गेनायझेशनतर्फे (जागतिक बौद्धिक संपदा संघटना – डब्लूआयपीओ) स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे २३ ते २५ एप्रिल या कालावधीत आंतरराष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन निवड फेऱ्यांचा समावेश असलेल्या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर २०२४ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या संघाने चित्रफितीद्वारे सादरीकरण केले. त्यापैकी फक्त १८ संघ पुढील टप्प्यात पोहोचले.
२५ ते २७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान झालेल्या दुसऱ्या टप्प्यात या संघाने आभासी फेरीत एका जटिल कायदेशीर काल्पनिक प्रकरणावर युक्तिवाद करून जगात प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. त्यानंतर दोघींनी अंतिम फेरीत उपविजेतेपदाला गवसणी घातली. या यशामुळे आम्हाला उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रयत्न करत राहण्याची आणि बौद्धिक संपदा कायद्याच्या क्षेत्रात अर्थपूर्ण योगदान देण्याची प्रेरणा मिळाल्याचे समाधान आर्या गौतम आणि संस्कृती शर्मा यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या संघाला ‘युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई लॉ ॲकॅडमी’च्या संचालक प्रा. राजेश्री वऱ्हाडी यांचे मार्गदर्शन लाभले. या दमदार कामगिरीबद्दल आर्या गौतम आणि संस्कृती शर्मा यांचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.