मुंबई: जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराविषयी वेगवेगळे प्रयोग सुरु आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचे प्रयोग अचंबित करत असतानाच मुंबई विद्यापीठाने प्रामुख्याने महिलांमधील गंभीर आजारांचे नियोजन व निदान तसेच विविध आजारांचे आगाऊ निदान करण्यासाठी काही रुग्णालयांच्या सहाय्याने कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेलचा विकास करण्याची योजना हाती घेतली आहे. यामुळे साथरोगादी आजारांची वेळीच कल्पना मिळून या आजारांना अटकाव करण्यात मोठी मदत मिळू शकणार आहे.

या कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेलचा वापर महाराष्ट्रातील आरोग्यासाठी वरदान ठरणार आहे. या ‘एआय’ मॉडेलमधील डिजिटल ट्विन प्रकाराचा फायदा साथरोग आजारांची आगाऊ माहिती मिळण्यासाठी होणार आहे. तसेच विभागवार विशिष्ट काळात उद्भवणाऱ्या आजारांचा डेटा गोळा करून त्याचे विश्लेषण केल्यामुळे त्याबाबतही वेळीच माहिती उपलब्ध होऊन आजारांना अटकाव करण्यासाठी तयारी करता येणार आहे. महिलांमधील स्तनांचा तसेच गर्भाशयाचा कर्करोग या सारख्या दुर्धर आजारांसाठीही हे ‘एआय मॉडेल’ उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुंबई विद्यापीठाच्या संशोधन व विकास विभागाचे संचालक डॉ. फारूख काझी यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – ४५ हजार कोटींच्या प्रकल्पांना गती; आचारसंहितेपूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन करण्याच्या हालचाली

‘प्रधानमंत्री उषा योजने’अंतर्गत हा प्रकल्प मुंबई विद्यापीठात राबविण्यात येत असून प्रामुख्याने आरोग्य, कृषी व शिक्षण विषयात एआय मॉडेल विकसित करण्याचे काम केले जाणार असल्याचे डॉ फारुख काझी यांनी सांगितले. कर्करोग व क्षयरोग तसेच विभागवार आजारांचा विचार करून कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक मॉडेल तयार केली जाणार आहेत. यासाठी आजारांचे नमुने व सखोल माहिती गोळा करावी लागणार आहे. यासाठी सध्या आम्ही टाटा कॅन्सर तसेच नानावटी रुग्णालयाच्या समन्वयातून काम सुरु केले आहे. मात्र लवकरच आम्ही नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठ, राज्याचा वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग आणि मुंबई महापालिका यांच्याबरोबर समन्वयातून व्यापक काम करणार असल्याचे डॉ. काझी यांनी सांगितले. करोना काळात आरोग्य विभाग व मुंबई महापालिकेने प्रचंड काम केले होते. सार्वजनिक आरोग्य विभागाची राज्यात ५०९ रुग्णालये असून जवळपास साडेतीन कोटी रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार केले जातात तर २५ लाखांहून अधिक रुग्णांवर दाखल करून उपचार केले जातात. मलेरियापासून वेगवेगळ्या साथीच्या आजारांवर वर्षानुवर्षे उपचार होतात तसेच राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमासह विविध आजारांवर उपचार केले जातात. तीच परिस्थिती मुंबई महापालिकेची असून या दोन्ही यंत्रणांकडे या विषयातील प्रचंड माहिती विभागवार आकडेवारीनिशी आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण विभाग व महापालिकेची वैद्यकीय महाविद्यालयातील संबंधित तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्यातून महाराष्ट्राच्या आरोग्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल विकसित करण्यात येईल, असे डॉ. काझी यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीमुळे अनेक आजारांचे वेळीच निदान होणे शक्य होत आहे. कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास त्याला मोठ्या प्रमाणात अटकाव करणे शक्य होईल. तसेच काही विभागवार किंवा काही भागांमध्ये मोठ्या संख्येने आढळून येणाऱ्या आजारांचा अभ्यास केल्यास कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने त्याचे वेळीच निदान होऊन उपचारास मदत होऊ शकते. अलीकडेच लंडनच्या इम्पिरिअल कॉलेजने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने ट्रायकॉर्डर नावाची संगणक आज्ञावली तयार केली. त्यामुळे ग्रामीण भागातील सामान्य डॉक्टरांनाही स्टेथोस्कोपच्या मदतीने हृदय बंद पडणे आदी निदान वेळीच करणे शक्य झाले आहे. स्टेथोस्कोपला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अल्गोरिदमची जोड देऊन ट्रायकॉर्डर प्रणाली कार्यान्वित केली गेली. याची संवेदनक्षमता ९१ टक्के तर अचूकता ८८ टक्के असल्याचे दिसून आले. यामुळे हृदयाकडून होणाऱ्या रक्तपुरवठ्याची माहिती मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील आरोग्याचा विचार करता सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठ तसेच मुंबई महापालिकेचे सहकार्य आरोग्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेलच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे, असेही डॉ काझी यांनी सांगितले.

हेही वाचा – अधिसभेमुळे सरकारची शोभा, निवडणूक स्थगितीबद्दल न्यायालयाची चपराक; मंगळवारी मतदान

तंत्रज्ञानाचा रोजच्या रोज विकास होत असतो. कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी सुरु असलेले संशोधन अचंबित करणारे आहे. याचा विचार करून मुंबई विद्यापीठाने एआय मॉडेलच्या विकासासाठी अमेरिकेतील पर्ड्यू युनिव्हर्सिटी व सेंट लुईस विद्यापीठांसोबत सामंजस्य करार केल्याचे मुंबई विद्यापीठाच्या आयटी विभागाच्या प्रमुख डॉ वरमांगी यांनी सांगितले.