मुंबई : महिला पत्रकाराच्या घरात शिरून त्यांना व कुटुंबियांना धमकावल्याप्रकरणी बोरिवली येथील एमएचबी पोलिसांनी चार अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार पत्रकार नेहा पुरव यांनी नुकतीच एक बातमी केली होती. अशी बातमी पुन्हा करून नये, अशी धमकी आरोपींनी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारीनुसार, पुरव यांनी १४ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील एका उमेदवाराविरोधात बातमी केली होती. ती प्रसिद्ध झाल्यानंतर २५ एप्रिल रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास पुरव यांच्या बोरिवली येथील घरी २५ ते ३० वयोगटातील चार अनोळखी व्यक्ती आले होते. पुरव त्यांच्या पतीने दरवाजा उघडला असता चार व्यक्ती घरात शिरले व त्यांनी बातमीबाबत विचारणा केली.
हेही वाचा…खार सब वेवरील उन्नत मार्ग प्रकल्प रद्द होणार ? नागरिकांच्या सूचनांचा प्रशासन अभ्यास करणार
त्यावळी नेहा पुरव बाहेर आल्या असता त्यांना त्या चार व्यक्तींनी बातमी पुन्हा करू नये, असे धमकावले. त्यानंतर पुरव यांनी शनिवारी एमएचबी पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी चार अनोळखी व्यक्तींविरोधात भादंवि कलम ४४८ (घरात जबरदस्ती शिरणे), ५०६ (धमकावणे) व ३४ (सामायिक हेतू) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.