परिवहन विभाग मात्र अनभिज्ञ
शहरात प्रवासी वाहतुकीचा परवाना नसताना ‘अॅप’ आधारित टॅक्सीपाठोपाठ आता ‘अॅप बेस्ड’ बस गाडय़ांही रस्त्यावर उतरल्या आहेत. टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या उद्धटपणामुळे प्रवासीही या वाहतूकदारांकडे वळत आहेत. मात्र या ‘अॅप’ आधारित बस गाडय़ांची नोंद परिवहन विभागाकडे नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षेविषयी आणि परिवहन विभागाच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.
सध्या शहररातील विविध भागांत बेकायदेशीर ‘अॅप’वर आधारित सुमारे २०० हून अधिक बसगाडय़ा चालवल्या जात आहेत. मात्र या ‘अॅप बेस’ वाहतूकदारांची कोणतीही माहिती परिवहन विभागाकडे नसल्याने प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचा आरोप केला जात आहे. अशा प्रकारच्या वाहतूकदरांवर तातडीने कारवाई केली जावी, अशी मागणी टॅक्सी युनियनकडून केली जात आहे. तर सार्वजनिक वाहतुकीत नवे प्रयोग होत असतील तर त्याचे स्वागत करायला हवे, असे मत वाहतूक तज्ज्ञ अशोक दातार यांनी नोंदवले.
गेल्याच आठवडय़ात अशा प्रकारच्या ‘अॅप’वर आधारित प्रवासी वाहतूक करणाऱ्या पाच बस गाडय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या आणखी बस गाडय़ा रस्त्यावर धावत आहेत का? याची माहिती घेऊन कठोर कारवाई करण्यात येईल.
– श्याम वर्धने, आयुक्त, राज्य परिवहन विभाग