मुंबई : महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित ‘फुले’ या हिंदी चरित्रपटात कोणत्याही जातीचा अनादर केलेला नाही. काही जाती संस्थांच्या लोकांमध्ये या चित्रपटावरून विनाकारण वाद सुरू आहेत, अशी स्पष्ट भूमिका चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता’कडे मांडली. सेन्सॉर बोर्डाने नव्याने बदल सुचवल्याने चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर गेल्याचा इन्कार करतानाच ‘प्रेक्षकांना शांतपणे चित्रपट पाहता यावा’ यासाठी तो निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य, त्यांचा संघर्ष समाजापुढे मांडणारा अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ हा हिंदी चरित्रपट ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आधी ब्राह्मण संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला. महात्मा फुले यांना ब्राह्मणांकडून अन्याय्य वागणूक मिळाल्याचे एकांगी चित्रण चित्रपटात असल्याचा दावा ब्राह्मण महासंघाने केला होता. महादेवन यांनी मात्र त्याचे खंडन केले होते. हा वाद शांत होईपर्यंत सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील काही प्रसंगांना कात्री लावल्याचे वृत्त पसरले आणि वादाला तोंड फुटले.

हा संपूर्ण वाद विनाकारण असल्याचे महादेवन यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. सध्या विविध जातीसंस्था आणि लोकांमध्येच या चित्रपटावरून गैरसमज निर्माण झाले असल्याने गोंधळ वाढला आहे. हे गैरसमजाचे धुके कमी होऊन सगळ्या प्रेक्षकांना शांतपणे चित्रपट पाहता यावा यासाठी चित्रपटाचे प्रदर्शन २५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘सेन्सॉरचे बदल आधीचेच’

अभिनेता प्रतीक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘फुले’ चित्रपटात महार, मांग, मनूची जाती व्यवस्था अशा काही शब्दांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता. तसेच ब्राह्मण मुलाने सावित्रीबाईंवर शेण फेकण्याचा प्रसंग अशा काही दृश्यांमध्ये बदल सुचवले होते. हे बदल ब्राह्मण महासंघाच्या आक्षेपानंतर केल्याचा आरोप होत होता. मात्र, या चर्चेत तथ्य नसल्याचे महादेवन यांनी स्पष्ट केले. ‘११ एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित होणार होता. महासंघाने आक्षेप घेण्याआधीच सेन्सॉरचे यू प्रमाणपत्र आम्हाला मिळाले होते. सेन्सॉरसाठी दोन वेळा चित्रपट दाखवण्यात आला. सुरूवातीला सेन्सॉर सदस्यांना चित्रपट दाखवल्यानंतर जे बदल सुचवण्यात आले होते, ते करून दुसऱ्यांदा चित्रपट दाखवण्यात आला,’ असे ते म्हणाले.