लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : मागाठाणे परिसरातील भ्रामक पत्रक वाटपप्रकरणी सोमवारी कस्तुरबा मार्ग, समता नगर आणि दहिसर पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले. पत्रक वाटणाऱ्यांविरोधात या प्रकरणी तक्रार करण्यात आली होती.

शिवसेनेचे (ठाकरे गट) उदेश पाटेकर यांच्या नावाने भ्रम निर्माण होईल, अशी पत्रके या परिसरात वाटण्यात आली. या पत्रकांमध्ये राकेश ऊर्फ उदेश पाटेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे. तथापि, ही पत्रके मतदारांची दिशाभूल करण्यासाठी तयार करण्यात आली आहेत, असा आरोप उदेश पाटेकर यांनी केला. तो करताना, राकेश हे नाव लहान अक्षरांमध्ये छापले गेले होते, तर उदेश पाटेकर मोठ्या अक्षरांमध्ये छापले होते. याकडेही पाटेकर यांनी लक्ष वेधले.

आणखी वाचा-मुंबई सेन्ट्रल रेल्वे टर्मिनस येथून ४२ लाख जप्त

संबंधित पत्रके वाटणाऱ्याविरोधात अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मतदारांनी मला प्रचंड प्रेम दिले. त्याच्या जोरावर मी आमदार म्हणून निवडूनदेखील येईन. पण, मी मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही. कारण कोणत्याही परिस्थितीत माझी सत्ता येणार नाही. त्यामुळे, मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे शिवसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देतो. धनुष्यबाणासमोरील बटण दाबून शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करावे असे निवेदन करतो, असा मजकूर पत्रकात आहे. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ही पत्रके दाखवून या पत्रकांवरून विरोधकांवर आरोप केले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unpardonable offences in magathane pamphlet case mumbai print news mrj