लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये मोठा फटका बसल्याने प्रदेश भाजपमध्ये भूकंप झाला आहे. या अपयशाची जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती पक्षश्रेष्ठींना करणार असल्याचे बुधवारी जाहीर केले. त्यामुळे भाजप व महायुतीत गोंधळाची स्थिती असून फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये, अशी गळ प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रदेश सुकाणू समितीच्या नेत्यांनी घातली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पराभवाची जबाबदारी सर्व घटक पक्षांची असल्याचे म्हटले आहे.

लोकसभा निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी फडणवीस, बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी दुपारी झाली. त्यात मतदारसंघनिहाय मुद्द्यांचा व मतदानाच्या आकडेवारीचा आढावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा मनोदय या बैठकीत फडणवीस यांनी व्यक्त केला नाही. मात्र नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आपल्या निर्णयाबाबत निवेदन करून ते बाहेर पडले. पुढील काही दिवसांमध्ये पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन चर्चा करणार असून त्यांच्या सूचना व सल्ल्यानुसार पुढील निर्णय घेईन, असे फडणवीस यांनी नमूद केले. फडणवीस यांची क्षमता मोठी आहे. त्यांनी सरकारमध्ये राहूनच पक्षासाठी आठवड्याचे चार दिवस देऊन संघटना मजबूत करावी,’’ अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>>‘पिपाणी’चा राष्ट्रवादीला फटका; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दावा

पराभवाची कारणमीमांसा

अपप्रचार, मतांचे ध्रुवीकरण, मराठा आरक्षण, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी, कांदा निर्यातबंदी म्वत बाबींचा फटका भाजपला बसल्याची चर्चा बैठकीत करण्यात आली. बावनकुळे व शेलार यांच्यासह पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. निवडणूक निकालाविषयी चिंतन करण्यासाठी पुन्हा बैठक घेणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही समन्वयाच्या मुद्द्यावर चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.

भाजपला राज्यात अपेक्षेपेक्षा खूपच कमी जागा मिळाल्या. निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढली गेल्याने अपयशाची जबाबदारी माझीच आहे. भविष्यात त्रुटी दूर केल्या जातील. – देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री