चुनाभट्टीत अनधिकृत तज्ज्ञाकडून रुग्णाला चुकीचा अहवाल
रक्त, मूत्र, रक्तदाब अशा विविध तपासण्या करण्याचे प्रमाण नागरिकांमध्ये वाढत असल्याचा गैरफायदा घेत मुंबईतील विविध भागांत अर्धशिक्षित वैद्यकीय तपासणी तज्ज्ञांनी (पॅथॉलॉजिस्ट) आपली बेकायदा दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच चुनाभट्टी येथे पॅथॉलॉजीचे शिक्षण नसलेल्या एका ‘तज्ज्ञा’ने रुग्णाला चुकीचा वैद्यकीय अहवाल दिल्याचे उघड झाले आहे. चुनाभट्टीसह, गोवंडी, चेंबूर, मानखुर्द या भागांत अशा प्रकारे बेकायदा पॅथॉलॉजी केंद्रे सुरू असून संपूर्ण मुंबईत एक हजारहून अधिक बेकायदा केंद्रे सुरू असल्याचे मत पॅथॉलॉजी संघटनांनी व्यक्त केले आहे.
चुनाभट्टीतील हिल रोडजवळील शुभांगी पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी मध्यवर्ती असल्याने या परिसरातील बहुतांश डॉक्टर तपासणी करण्यासाठी रुग्णांना या पॅथॉलॉजीकडे पाठवितात. ही पॅथॉलॉजी व्ही. पी. माने नावाचा व्यक्ती चालवीत आहे. विज्ञान शाखेतील पदवी घेतलेला माने पॅथॉलॉजिस्टचे वैद्यकीय शिक्षण न घेता रक्ताच्या नमुन्यांची तपासणी करण्याबरोबरच अहवालावरही अनधिकृत स्वाक्षरीही करीत आहे. ही बाब या परिसरात राहणारे वकील आनंद वऱ्हाडकर यांनी पुढे आणली आहे. आनंद वऱ्हाडकर यांचा सहा वर्षांच्या पुतण्या तन्मय वऱ्हाडकर याचा ५ जुलै २०१६ रोजी रक्तगट तपासण्यात आला होता. त्या वेळी शुभांगी पॅथॉलॉजीने ‘अ’ रक्तगट असल्याचा अहवाल दिला होता. १९ जुलै रोजी तन्मय याला सातत्याने ताप येत असल्याने डॉक्टरांनी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले. या वेळी कुटुंबीयांनी तन्मयचा रक्तगट पुन्हा तपासण्यास सांगितले होते. त्या वेळी माने यानेच ‘ओ’ रक्तगटाचा अहवाल दिला. २०१६ साली ए रक्तगटाचा मुलगा २०१७ साली ओ रक्तगट दाखविण्यात आल्याने पालक संभ्रमित झाले.
ही बाब प्राथमिक पातळीवर क्षुल्लक वाटत असली तरी यामुळे आजारांवर उपचार करताना मोठा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने अशा बोगस पॅथॉलॉजीवर कारवाई करावी, अशी मागणी आनंद वऱ्हाडकर यांनी केली आहे. माने यांनीदेखील ‘लोकसत्ता’शी बोलताना आपली चूक मान्य केली.
या घटनेने मुंबईतील बेकायदा पॅथॉलॉजी केंद्रांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ‘राज्यभरात ५ ते ७ हजार बेकायदेशीर पॅथॉलॉजीच्या लॅब आहेत. यातही मुंबई शहरातील अशा बेकायदेशीर लॅबची संख्या सुमारे १००० च्या घरात आहे.राज्यात किती अधिकृत पॅथॉलॉजी लॅब आहेत, याची माहितीच सरकारकडे उपलब्ध नाही. सरकार याकडे दुर्लक्ष करीत असून यामुळे राज्यात अनेक ठिकाणी रुग्णांना याचा फटका बसतो आहे,’ अशी माहिती महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट एन्ड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटनेचे प्रमुख डॉ. संदीप यादव यांनी दिली. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया, १९५६, महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर अॅक्ट १९६१ व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लॅबमधील तंत्रज्ञ वैद्यकीय अहवालावर स्वाक्षरी करू शकत नाही, असेही यादव यांनी सांगितले.
कारवाई करणे कठीण
अशा बेकायदा केंद्रांवर कारवाई करणे कठीण असल्याचे मत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट’ कायद्याशिवाय पॅथॉलॉजीवर नियंत्रण आणता येणार नाही, असे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. पद्मजा केसकर या म्हणाल्या.
मुंबईतील मानखुर्द, गोवंडी, चुनाभट्टी या भागांत अनेक बेकायदेशीर लॅबचा सुळसुळाट झाला आहे. यांच्याकडून अनेकदा चुकीचे वैद्यकीय अहवाल देण्यात येतात. याचा रुग्णांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता आहे. महापालिकेने अशा बोगस पॅथॉलॉजींवर कारवाई करून शिक्षा करावयास हवी.
– प्रसाद कुलकर्णी, महाराष्ट्र पॅथॉलॉजी असोसिएशन