शैलजा तिवले
राज्यात करोना प्रसाराचा वेग वाढला असून बाधितांचे प्रमाण सरासरी १३ टक्क्यांपर्यंत वाढले आहे, तर आठवडाभरातील नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या ५० हजारांहून ९० हजारांच्या घरात पोहोचली आहे. सर्वाधिक वाढ अकोल्यात झाली असून त्याखालोखाल जळगाव, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर आणि वर्धा येथे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु त्या तुलनेत मृत्युदरात मात्र घट झाल्याचे निदर्शनास येते.
राज्यात गेल्या महिनाभरात अमरावतीत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. त्यानंतर हळूहळू राज्यातील इतर जिल्ह््यांमध्येही संसर्ग वाढला आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात गेल्या वर्षीच्या (२०२०) जुलैप्रमाणे स्थिती झाली असून आठवड्याला ५० हजार रुग्णांची नव्याने भर पडली. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातच रुग्णसंख्या ४ टक्क्यांनी वाढून ९० हजारांपर्यंत गेला आहे. यापूर्वी ऑगस्टच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात ८९ ते ९० हजार रुग्णांचे निदान होत होते.