नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्याने विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणुकांमध्ये विद्यमान की नव्याने निवडून येणारे नगरसेवक यापैकी मतदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नगरपालिका निवडणुकीत खर्चाची ‘सोय’ होईल या आशेवर नगरसेवक असले तरी निवडणुकीच्या दिवशी अस्तित्वात असलेल्या नगरसेवकांनाच मतदानाचा अधिकार प्राप्त होणार आहे.
स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातील निवडणूक म्हणजे नगरसेवक मंडळींना पर्वणी असते. कारण या निवडणुकीत मते खरेदी करण्याची ताकद असते तोच उमेदवार रिंगणात उतरतो. मतांचे गणित जुळविताना मतदारराजाला खूश केले जाते. एकेका मताला दोन ते दहा लाखांपर्यंत भाव जातो. नगरसेवक मंडळी यामुळेच खूश असतात. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुणे, जळगाव, यवतमाळ, गोंदिया-भंडारा, सांगली-सातारा आणि नांदेड या सहा मतदारसंघांत निवडणूक होत असल्याने नगरसेवक आशेवर आहेत. नगरपालिका निवडणुकीचा खर्च सुटेल, असे अनेकांचे गणित आहे. पण नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नसल्याने नगरसेवकांच्या पोटात साहजिकच गोळा आला आहे.
नक्की मतदार कोण?
निवडणुकीत उमेदवार निवडून आले व त्यांची नावे शासकीय गॅझेटमध्ये प्रसिद्ध झाली तरी ते लगेचच नगरसेवक म्हणून गणले जात नाहीत. विद्यमान नगरपालिकेची मुदत संपल्यावर होणाऱ्या पहिल्या बैठकीपासून नगरसेवक म्हणून त्यांना अधिकार प्राप्त होतात. म्हणजेच २८ नोव्हेंबरला निवडून येणारे सदस्य लगेचच नगरसेवक म्हणून पात्र ठरणार नाहीत. याचाच अर्थ विद्यमान नगरसेवकच या निवडणुकीत पात्र ठरू शकतात. विधान परिषदेच्या सहा आमदारांची मुदत ही ५ डिसेंबरला संपत आहे. विधान परिषद आणि नगरपालिका निवडणुका दोन्ही एकाच वेळी येऊ नये म्हणून निवडणूक आयोगाला नगरपालिका निवडणुकांच्या तारखांची माहिती देण्यात आल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया आणि सहनिवडणूक आयुक्त शेखर चन्न्ो यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकलली गेल्यास मात्र नवे नगरसेवक मतदार म्हणून पात्र ठरू शकतात. असा पेच यापूर्वी कधी निर्माण झाला नव्हता, याकडे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. भाजपला मात्र जुन्यापेक्षा नव्या नगरसेवकांच्या संख्याबळानुसार निवडणूक व्हावी, अशी अपेक्षा असेल. निवडणूक होत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील आठही नगरपालिकांच्या निवडणुका २७ नोव्हेंबरला होणार आहेत. नांदेड जिल्ह्यात १८ डिसेंबर, पुणे जिल्ह्य़ात १४ डिसेंबर, भंडारा जिल्ह्यात १४ डिसेंबर, गोंदियामध्ये ८ जानेवारी, सांगली-सातारा या जिल्ह्य़ांमध्ये २७ नोव्हेंबर, जळगाव जिल्ह्यात २७ नोव्हेंबरला मतदान होईल.