अप्पर वैतरणामधील राखीव जलसाठा दुष्काळग्रस्त गावांना देण्याचा राज्य सरकारचा निर्णय;
मान्सून वेळेत न आल्यास वितरणाचे गणित कोलमडण्याची पालिकेला भीती
दुष्काळात होरपळून जाणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेची तहान भागवण्यासाठी राज्याच्या जलसंधारण विभागाने आता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा धरणातील राखीव साठा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या पाण्यामुळे दुष्काळी गावांना पाणी मिळणार असले तरी यंदाही मान्सून वेळेत न आल्यास मुंबईकरांवर मोठे पाणीसंकट येऊ शकते. राखीव कोटय़ातील पाणी दिल्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याचे गणित कोलमडण्याची भीती पालिकेने व्यक्त केली असून तसे पत्रही जलसंधारण विभागाकडे पाठवले आहे. मात्र त्याला अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही.
मुंबईकरांना दररोज ३७५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र अपुऱ्या पावसामुळे पालिकेने ऑगस्ट २०१५ मध्ये १५ टक्के पाण्यात, तर २० टक्के वेळेत कपात करण्यात आली असून आजघडीला मुंबईकरांना ३२५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. पालिकेच्या या नियोजनामुळे तलावांमधील उपलब्ध जलसाठा जुलै अखेरीपर्यंत पुरेल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मुंबई शहराची गरज भागविणाऱ्या पाणीसाठय़ाचा विचार करून दरवर्षी पाणीसाठा केला जातो. आणीबाणीच्या परिस्थितीसाठी पालिकेच्या धरणांमधील दोन लाख दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा राखीव ठेवला जातो. सध्या पालिकेच्या धणांमध्ये सुमारे दोन लाख ९० हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. यापैकी ९० हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा मे अखेरीपर्यंत पुरवला जाऊ शकतो. तोपर्यंत पाऊस पडला नाही तर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी राखीव साठय़ातील पाण्याचा वापर करावा लागणार आहे. यामुळे जर टंचाईग्रस्त भागांमध्ये पाणीपुरवठा करण्यात आला तर मुंबईच्या पाण्याची गणित कोलमडेल आणि शहराला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
मुंबईच्या आसपासच्या शहरांनाही आजघडीला अपुरा पाणीपुरवठा होऊ लागला आहे. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पाण्याची स्थिती भिषण आहे. त्यामुळे अप्पर वैतरणामधील राखीव पाणीसाठा या शहरांना देण्याचा विचार जलसंधारण विभाग करीत असून त्याबाबत पालिकेला कळविण्यातही आले आहे. जलसंधारण विभागाची भूमिका समजताच पालिका अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. अप्पर वैतरणा धरण पालिकेने स्वत: बांधले असून त्यातील पाण्यावर पालिकेचा पूर्ण हक्क आहे. भातसा धरणातूनही मुंबईला पाणीपुरवठा होतो. हे धरण राज्य सरकारचे असल्याने त्यातील पाणी अन्य काही शहरांना पुरविण्यास सुरुवात केली आहे. भातसातून पालिकेला मिळणाऱ्या पाण्यातही कपात करण्याचा जलसंधारण विभागाचा विचार आहे. त्यामुळे जल विभागातील अधिकारी चिंतित झाले आहेत.

पाणी परिस्थितीचा आढावा जलसंधारण विभागाला देण्यात आला आहे. अप्पर वैतरणातील राखीव कोटय़ातील पाणी मुंबईकरांनाच मिळावे याबाबत जलसंधारण विभागाला पत्र पाठविण्यात आले आहे. मात्र त्याबाबत जलसंधारण विभागाने पालिकेला अद्याप काहीच कळवलेले नाही.
– डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त

Story img Loader