मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मुंबई महापालिकेतील कार्यालयावरून विधानसभेत बुधवारी गदारोळ झाला. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने त्यास आक्षेप घेतला.काँग्रेसच्या वर्षां गायकवाड यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. पालकमंत्र्यांनी महापालिकेत कार्यालय सुरू करून माजी नगरसेवकांची बसण्याची व्यवस्था केली आहे. अन्य पक्षांचेही पालिकेत माजी नगरसेवक आहेत. मग त्यांनाही कार्यालये देऊन बसण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.
मुंबई महापालिकेतील पालकमंत्र्यांचे कार्यालय हटविण्याची मागणी नाना पटोले यांनी केली. ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांनीही लोढा यांचे कार्यालय हटविण्याची मागणी केली. सरकारने दखल घेतली नाही तर शिवसेनेच्या पद्धतीने या कार्यालयाचा बंदोबस्त करण्याचा इशारा प्रभू यांनी दिला.
सरकारतर्फे निवेदन करताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, पालकमंत्र्यांच्या सोयीनुसार त्यांचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय किंवा महापालिकेत असते. तो त्यांचा अधिकार असून त्यावर कोणीही अतिक्रमण करू नये.
काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या आमदारांनी विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ िशदे यांची भेट घेतली. या वेळी मुंबई महानगरपालिकेतील पालकमंत्री लोढा यांचे कार्यालय हटविण्याची मागणी पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.