विविध कामांच्या मूळ प्रस्तावात फेरफार करून मुंबई महापालिकेत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका कॅगने ठेवल्यामुळे शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत गदारोळ करीत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी याप्रकरणात सीआयडी चौकशीची मागणी करीत सभात्याग केला.
स्थायी समितीची बैठक सुरू होताच विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी सुगंधी दुधाचा पुरवठा बंद केल्यानंतर ठेकेदाराला न कळविल्यामुळे २ कोटी ७४ लाख रूपयांचा पालिकेला फटका बसलेला आहे. तर खड्डे बुजविण्यासाठी खरेदी करण्यात आलेले कोटय़ावधी रूपयांचे मशीनही गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. अशा प्रकारे सत्ताधाऱ्यांच्या कामावर ताशेरे ओढत कॅगच्या प्रश्नावर सभा तहकूबीची सूचना मांडली आणि पालिकेमार्फत झालेल्या भ्रष्टाचाराची सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
परंतू विरोधी पक्षांनी सुचविलेल्या कामामुळेच मूळ प्रस्तावात फेरफार करावे लागले आसल्याचे आरोप सत्ताधाऱ्यांनी केल्यानंतर विरोधक जास्तच आक्रमक झाले. त्यामुळे जोरदार घोषणाबाजी करीत निवेदन फाडून कागद अध्यक्षांच्या दिशेने भिरकावले. विरोधकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत हल्लकल्लोळ झाला, त्यावेळी माजी अतिरिक्त आयुक्त आर.ए.राजीव आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष रविंद्र वायकर यांच्या काळात ज्या मूळ प्रस्तावात फेरफार झाले त्याच्या चौकशीची मागणीही सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. कॅगच्या संदर्भात प्रशासन आपला अहवाल लवकरच राज्य सरकरला सादर करणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त आसीम गुप्ता यांनी स्पष्ट केले असून  कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास आम्ही तयार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष राहूल शेवाळे यांनी सांगितले.  आमदार आणि नगरसेवक कामे करून घेण्यासंदर्भात दबाव टाकत असल्याचाही ठपकाही कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत गदारोळ करणाऱ्या या सर्वपक्षीय नगरसेवकांनी यावर मात्र सोयीचे मौन बाळगल्याचे दिसतेय.

Story img Loader