केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नालासोपाऱ्याचा सुर्यभान यादव यानेदेखील यश मिळवलं आहे. सुर्यभान यादव केंद्रीय लोकसेवा परिक्षेत देशातून ४८८ क्रमांक पटकावत उत्तीर्ण झाला आहे. नालासोपारा मधून केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होणारा सुर्यभान यादव हा पहिला तरुण ठरला आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सुर्यभान याचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण नालासोपारा आणि वसईत झाले. अभियांत्रिकीची पदवी त्याने मिळवली होती. मात्र प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न असल्याने तो केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी केली. याआधी सुर्यभानने दोनवेळी प्रयत्न केले होते. तिसर्या प्रयत्नात तो उत्तीर्ण झाला. त्याचा देशात ४८८ वा क्रमांक आला. सुर्यभान यादवला आयपीएस होण्याची संधी आहे.
सुर्यभानचे बालपण चाळीत गेले. वडिल होमिओपॅथिक डॉक्टर होते. कुटुंबियांनी नोकरीचा तगादा न लावता शिक्षणाला प्रोत्साहन दिल्यामुळे हे यश मिळाल्याचे सुर्यभानने सांगितले. वसईचे आमदार हिेतेंद्र ठाकूर यांनी सुर्यभानच्या या यशाबद्दल शनिवारी संध्याकाळी त्याचा सत्कार केला.