‘केंद्रीय लोकसेवा आयोगा’च्या (यूपीएससी) दिल्लीत होणाऱ्या मुलाखती ज्या कालावधीत होणार आहे, त्याच कालावधीत ‘महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा’ची (एमपीएससी) मुख्य परीक्षा होत असल्याने त्या दोन्ही परीक्षांकरिता आपले नशीब आजमावणाऱ्या राज्यातील उमेदवारांची अडचण झाली आहे. त्यामुळे, एमपीएससीने किमान १० दिवस तरी मुख्य परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.
यूपीएससीचा मुलाखतीचा टप्पा ९ एप्रिलपासून सुरू झाला. या मुलाखती ५ जूनपर्यंत चालणार आहेत. याच दरम्यान म्हणजे ३०, ३१ मे आणि १ जून दरम्यान एमपीएसससी मुख्य परीक्षाही आयोजिण्यात आली आहे. त्या बाबतची सूचना एमपीएससीने २१ एप्रिलला सायंकाळी जाहीर केली. यातील मुख्य परीक्षेच्या तारखा पाहून उमेदवार चक्रावून गेले आहेत
एकाचवेळी या दोन्ही परीक्षांमध्ये आपले नशीब आजमावणारे अनेक उमेदवार असतात. यापैकी ज्या उमेदवारांची मुलाखत मे महिन्याच्या शेवटच्या आणि जून महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवडय़ात आली असेल त्यांना यापैकी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.
प्रत्येक दिवशी साधारणपणे ८० ते ८५ उमेदवारांच्या मुलाखती यूपीएससी घेते. यूपीएससीच्या मुलाखतीकरिता दिल्लीत जावे लागते. ज्या दिवशी मुलाखत असते त्याच्या दुसऱ्याच दिवशी उमेदवारांची वैद्यकीय चाचणीही घेतली जाते. त्यातून मध्ये साप्ताहिक सुट्टी आली की नाईलाजाने दोन ते तीन दिवस मुक्काम करावा लागतो. हे दोन दिवस आणि प्रवासाचे तीन दिवस मिळून साधारणपणे चार ते पाच दिवस या मुलाखतीमध्ये उमेदवारांना खर्चावे लागतात.
उमेदवारांच्या प्रतिक्रिया
माझी मुलाखत ३०, ३१मे किंवा १ जून दरम्यान किंवा आसपासच्या तारखांना जरी आली तर मला एमपीएससीच्या मुख्य परीक्षेवर पाणी सोडावे लागेल.
यूपीएससीच्या मुलाखती ५ जूनपर्यंत चालणार आहेत. त्यामुळे, एमपीएससीची परीक्षा चारपाच दिवसांनी नव्हे तर तब्बल १० दिवसांनी तरी पुढे ढकलावी लागणार लागणार आहे.