बालपणापासूनचा आपला एक घनिष्ठ मित्र परीक्षेत कॉपी करीत असेल तर तुम्ही काय कराल? परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या आपल्या मित्राची पर्यवेक्षकांकडे तक्रार कराल की त्याच्या गैरकृत्यांकडे कानाडोळा कराल? रोजच्या व्यवहारात पडणाऱ्या अशा लहान-मोठय़ा प्रश्नातून आपली सचोटी सिद्ध करण्याचे आव्हान यापुढे भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांना पेलावे लागणार आहे. कारण, ‘केंद्रीय प्रशासकीय सेवा आयोगा’ने (यूपीएससी) मुख्य परीक्षेत नव्याने समाविष्ट केलेल्या ‘मूल्ये, सचोटी आणि कल’ या नव्या पेपरमध्ये याच प्रकारच्या प्रश्नांचा सामना उमेदवारांना करावा लागणार आहे.
या वर्षीपासून यूपीएससीने आपल्या मुख्य परीक्षेत अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. उमेदवारांची सचोटी, कर्तव्य कठोरपणा, आणीबाणीची परिस्थिती हाताळताना ठेवावे लागणारे भान आदी भावनिक व मानसिक स्वरूपाच्या क्षमतांची तपासणी करणारा ‘मूल्ये, सचोटी आणि कल’ हा नवा पेपर यूपीएससीने अनिवार्य विषयांमध्ये समाविष्ट केला आहे.
नव्या पेपरचे स्वरूप कसे असेल याचा अंदाज उमेदवारांना यावा यासाठी यूपीएससीने दोन दिवसांपूर्वी आपल्या संकेतस्थळावर या पेपरची नमुना प्रश्नपत्रिका जाहीर केली. त्यात आपल्याला नेमक्या कोणत्या प्रश्नांचा सामना करावा लागणार आहे, याचा अंदाज उमेदवारांना येईल. या आधीही सी-सॅट हा नवीन पेपर समाविष्ट करताना यूपीएससीने नमुना प्रश्नपत्रिका संकेतस्थळावर जाहीर केली होती.
नवीन पेपरमध्ये नेमके कोणत्या प्रकारचे प्रश्न येणार, त्याचे स्वरूप काय असणार याचा अंदाज येण्यास या प्रकारच्या नमुना प्रश्नपत्रिकेचा उपयोग होतो. पाठांतर व रट्टेबाजीपेक्षा हे प्रश्न निश्चितपणे वेगळे आहेत. यात ‘केस स्टडी’मधून विचारण्यात आलेल्या प्रश्नांमधून उमेदवारांचा कल, कर्तव्यकठोरता तपासण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा