मुंबई : मेहनत आणि जिद्द असली की कोणतीही गोष्ट साध्य करता येते, हे धुळ्याच्या हिमांशू टेंभेकर याने दाखवून देत ‘यूपीएससी’ परीक्षेत देशात ७३८ वा क्रमांक प्राप्त केला आहे. यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन तीन वर्ष खासगी क्षेत्रात काम, पुढे एक वर्ष स्वतःचा फूड डिलिव्हरीचा स्टार्टअप आणि त्यानंतर ऊर्जा मंत्रालयाच्या सतलज जल विद्युत निगममध्ये अधिकारी म्हणून नियुक्ती असा प्रवास करीत हिमांशू टेंभेकर याने ‘यूपीएससी’ परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले.
धुळ्याच्या हिमांशू टेंभेकर हा पाच वर्षांचाच असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यानंतर तो आईसह मामाच्या घरी स्थायिक झाला. शाळेत असतानाच समाजासाठी कार्य करण्याची इच्छा हिमांशूच्या मनात होती. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित लोकमान्य टिळक महाविद्यालयातून त्याने यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तीन वर्ष एका खास कंपनीत त्याने काम केले. परंतु स्वतःचा छोटासा व्यवसाय असावा, हा विचार त्याच्या मनात होता. त्यामुळे त्याने eat@night या नावाने फूड डिलिव्हरीचा स्टार्टअप सुरु केला. रात्री १० ते सकाळी ५ या वेळेत फूड डिलिव्हरीचे काम चालायचे. जवळपास एक वर्ष फूड डिलिव्हरीचे त्याचे काम यशस्वीरित्या सुरू होते. या दरम्यानच त्याची ऊर्जा मंत्रालयाच्या सतलज जल विद्युत निगममध्ये अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. परंतु प्रशासकीय सेवेत काम करणे हे सुद्धा त्याच्या मनात होते. त्यामुळे फूड डिलिव्हरीच्या स्टार्टअपनंतर नोकरी सांभाळून ‘यूपीएससी’ परीक्षेचा अभ्यास करण्यास हिमांशूने सुरुवात केली. कोणत्याही शिकवणी वर्गात प्रवेश न घेता, केवळ स्वतःची अभ्यासपध्दती व वेळेचे नियोजन करीत हा प्रवास पूर्ण केला. २०१६, २०१७, २०१८, २०१९, २०२० अशी पाच वेळा त्याने ‘यूपीएससी’ परीक्षा दिली, परंतु यश आले नाही. त्यानंतर दोन वर्षे ब्रेक घेत पुन्हा २०२३ साली त्याने परीक्षा दिली आणि देशात ७३८ वा क्रमांक प्राप्त केला.
हेही वाचा : मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
‘मला समाजासाठी कार्य करण्याची इच्छा होती. त्यामुळे ‘यूपीएससी’ची परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत यायचे हे सुरुवातीलाच ठरविले होते. नोकरी सांभाळून मी ‘यूपीएससी’च्या परीक्षेच्या अभ्यास केला. वेळेचे नियोजन आणि स्वतःची अभ्यासपद्धती तयार करून मी हा अभ्यास केला. ‘यूपीएससी’ परीक्षा देणाऱ्या इतर विद्यार्थ्यांनीही स्वतःची कार्यपद्धती बनविली पाहिजे, कारण स्वतःची कार्यपद्धती असली की अभ्यास करणे सोपे जाते. तसेच मला पक्षी निरीक्षण, कविता लेखन आणि गायनाची आवड आहे. हे छंद जोपासल्यामुळे मला ‘यूपीएससी’ परीक्षेच्या प्रवासात कधीच कंटाळा आला नाही आणि माझ्या वेळापत्रकाचा समतोल राखला गेला’, असे हिमांशू टेंभेकर याने सांगितले.