वसईतील जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणे यांची मुख्यमंत्र्यांवरही टीका
वसई : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ सहीपुरते मंत्री उरले असून या विभागाच्या सर्व फायली मातोश्रीमधून मंजूर केल्या जातात, असा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. जन आशीर्वाद यात्रेनिमित्ताने वसईत आलेल्या राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करतानाच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची ‘चिरंजीव मंत्री’ म्हणून खिल्ली उडवली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा शनिवारी वसई विरार शहरात आली. या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ सहीपुरते मंत्री उरलेले आहेत. नगरविकास खात्याच्या सर्व फायली मातोश्रीमधून मंजूर होतात, असा आरोप त्यांनी केला. शिंदेदेखील या प्रकाराला कंटाळले असून लवकरच निर्णय होईल, असा गौप्यस्फोटही राणे यांनी केला. मी घरात आणि पिंजऱ्यात बसून काम करणारा नाही. व्यासपीठावर डावी-उजवीकडे बघून उत्तरे देत नाही अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर शिवसैनिकांनी त्या स्मारकाचे शुद्धीकरण करून घेतले होते. त्याबद्दल त्यांनी पुन्हा शिवसैनिकांवर टीका केली. मी माझ्या वडिलांचे स्मारक स्वत:च्या पैशांनी व दलदलीच्या जागेत न बांधता चांगल्या जागेत बांधले आहे अशा शब्दांत खोचक टीका केली.
यात्रा सोडून हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला
जन आशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे यात्रेच्या मध्येच वसईचे आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला गेल्याने भाजप कार्यकर्ते संतप्त झाले. राणे यांनी जाऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी विरोध केला; परंतु त्याला न जुमानता राणे ठाकूर यांना भेटायला गेले. ठाकूर यांनी राणे यांचे स्वागत करत त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. रात्री ८ च्या सुमारास राणे यांची जन आशीर्वाद यात्रा विरार येथे पोहोचली. त्या वेळी आमदार आणि हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर राणे यांच्या स्वागताला गेले. त्यांनी राणे यांच्या पाया पडून अभिवादन केले आणि भेटीला बोलावले. राणे यांनी ठाकूर यांना भेटायला जाऊ नये असा कार्यकर्त्यांनी आग्रह केला. त्याला न जुमानता राणे ठाकूर यांना भेटायला विवा महाविद्यालयात गेले. यामुळे कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला. ठाकूर यांनी राणे आमचे मार्गदर्शक आहेत, असे सांगत त्यांचे कौतुक केले. इतके दिवस मेहनत करून यात्रेचे आयोजन केले आणि एका क्षणात बट्ट्याबोळ केला अशी प्रतिक्रिया एका भाजप नेत्याने दिली. ज्यांच्याविरोधात लढायचे आहे त्यांचीच गळाभेट घेणे हे कार्यकर्त्यांना नाउमेद करणारे लक्षण आहे, असे या नेत्याने सांगितले.
भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर ३६ गुन्हे दाखल
मुंबई : भारतीय जनता पक्षाने काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेवर मुंबईत ३६ गुन्हे दाखल झाले आहेत. यापूर्वी १९ गुन्हे नोंदविण्यात आले होते. शनिवारी यामध्ये आणखी १७ गुन्ह्यांची भर पडली. विनापरवानगी आणि करोना नियमांचे उल्लंघन करून या यात्रेचे आयोजन केल्याप्रकरणी पोलिसांनी आयोजक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे नोंदविले आहेत.
मुंबईतही गुरुवारी आणि शुक्रवारी विविध ठिकाणी गेलेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते सामील झाले होते. याप्रकरणी विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर, गोवंडी, आग्रीपाडा, सहार विमानतळ, काळाचौकी, शीव, आझाद मैदान, गावदेवी, मुलुंड, पवई, एमआयडीसी, मेघवाडी, गोरेगाव, चारकोप, बोरीवली आदी विविध पोलीस ठाण्यांमध्ये ३६ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे, संसर्गजन्य आजार पसरविण्याची कृती करणे आणि आपत्तीव्यवस्थापन कायद्यांतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.