मुंबई : शहरी नक्षलवादाच्या आरोपाप्रकरणी गेल्या चार वर्षांहून अधिक काळ कारागृहात असलेला आरोपी सागर गोरखे याला कायद्याच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्राची परीक्षा देण्यासाठी विशेष न्यायालयाने शुक्रवारी २२ दिवसांचा तात्पुरता अंतरिम जामीन मंजूर केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने गोरखे याला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलका आणि तेवढ्याच रकमेच्या हमीदारावर जामीन मंजूर केला. आरोपी रक्कम जमा करण्यास असमर्थ असल्यास त्याची २५ हजार रुपयांच्या रोख रकमेवर सुटका करण्याचे विशेष न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने गोरखे याला १४ डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीसाठी जामीन मंजूर दिला आहे.

हेही वाचा >>>मुंबई : बाणगंगा पुनरुज्जीवन प्रकल्प, रामकुंड जतनासाठी ‘हार्बर इंजिनीअरिंग’

बंदी घातलेल्या सीपीआयची (माओवादी) कथित संलग्न संघटना कबीर कला मंचचा सदस्य असल्याच्या आरोपावरून गोरखे याला सप्टेंबर २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. सध्या तो नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आहे. गोरखे याने छत्रपती संभाजीनगर येथील विधी महाविद्यालयात तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. परंतु, तुरुंगातील गर्दी आणि तणावपूर्ण स्थितीमुळे आपल्याला अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेची तयारी करता येणार नाही. आपण राहत असलेल्या बॅरॅकची क्षमता १८ कैद्याची आहे. परंतु, सद्यास्थितीत तेथे ४० हून अधिक कैदी बंदिस्त आहेत. त्यामुळे, अभ्यासावर लक्ष केंद्रीत करून कोणत्याही तणावाशिवाय परीक्षेची तयारी करण्याकरिता तात्पुरता अंतरिम जामीन मंजूर करण्याची मागणी गोरखे याने विशेष न्यायालयाकडे केली होती. ती विशेष न्यायालयाने मान्य केली. दरम्यान, याच प्रकरणातील आणखी एक आरोपी महेश राऊत यालाही विशेष न्यायालयाने एलएलबीच्या प्रवेश परीक्षेला बसण्याची परवानगी दिली.