मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी विडंबनात्मक गाणे सादर केल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी हस्यकलाकार कुणाल कामरा याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या याचिकेवर मंगळवारी तातडीची सुनावणी होणार आहे. मात्र, अंतरिम संरक्षणासाठी कामरा याने संबंधित एकलपीठाकडे दाद मागावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठापुढे कामरा याची याचिका वरिष्ठ वकील नवरोज सिरवई यांनी सादर केली. तसेच, कामरा याच्या जीवाला धोका असल्याने त्यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. कामरा याला मद्रास उच्च न्यायालयाने याच कारणास्तव अंतरिम संरक्षण दिले आहे. त्यामुळे, आम्ही अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी करत नसल्याचेही कामरा याच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले. त्यावर, कामरा याच्या जीवाला धोका आहे या तुम्ही दिलेल्या कारणास्तव आम्ही त्याच्या गुन्हा रद्द करण्याच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेऊ. परंतु, अंतरिम संरक्षणासाठी तुम्ही संबंधित एकलपीठाकडे दाद मागावी. आम्ही हा मुद्दा अजिबात ऐकणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. तसेच, कामरा याच्या गुन्हा रद्द करण्याच्या याचिकेवर मंगळवारी तातडीची सुनावणी ठेवली.

कामराच्या विरोधात शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते आक्रमक झाले होते. त्यानंतर, कामराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या प्रकरणी कुणाल कामराला अटक करण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. मात्र, कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि मद्रास उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर करत ७ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर, कामरा याने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, आपल्यावरील कारवाई ही संविधानाच्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या, कोणताही व्यवसाय करण्याच्या, जगण्याच्या तसेच वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकारांचे उल्लंघन असल्याचा दावा कामरा याने याचिकेत केला आहे.

कामरा याला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी आतापर्यंत पाच समन्स बजावले आहेत. मात्र, तो मुंबई पोलिसांसमोर उपस्थित झालेला नाही. तसेच, मुंबई पोलीस कामरा याच्या चौकशीसाठी त्याच्या मुंबईतील घरी देखील गेले होते.

प्रकरण काय ?

कामरा याने आपल्या कार्यक्रमामध्ये राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत टीका केली होती. यामध्ये कामरा याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीचा संदर्भ दिला होता. तसेच, महाराष्ट्राच्या निवडणुकीत त्यांनी काय केलं आहे, त्यांना सांगावं लागेल. आधी शिवसेना भाजपामधून बाहेर पडली, नंतर शिवसेना शिवसेनेतून बाहेर पडली. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीतून बाहेर पडली, असे म्हणत कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक व्यंगात्मक गाणेही सादर केलं होते. मात्र, व्यंगात्मक गाणे सादर केल्यानंतर शिवसेनेच्या (शिंदे) कार्यकर्त्यांनी मुंबईतील खारमधील कार्यक्रमस्थळाच्या स्टुडिओची तोडफोड केली होती. तसेच, कामरा याच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती.