लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर टाकलेला करवाढीचा ‘बॉम्ब’ आणि त्याला चीनच्या प्रत्युत्तरामुळे जागतिक व्यापार युद्ध आणि मंदी ओढावण्याची भीती सोमवारी दृश्य रुपात दिसली. मुंबई शेअर बाजाराच्या ‘सेन्सेक्स’ने दिवसभरात २२२७ अंशांची घसरण नोंदवली तर, जगभरातील शेअर बाजारांत घसरगुंडी उडाली. या आर्थिक अस्थैर्याचे परिणाम खनिज तेल आणि सोने यांच्यावरही दिसून येत आहेत. ट्रम्प यांनी सोमवारी चीनवर ‘आणखी ५० टक्के’ कर लादण्याची धमकी दिल्याने बाजारांतील खळबळ अशीच सुरू राहण्याची चिन्हे आहेत.

भारतासह अन्य देशांवर लावलेले व्यापार कर ‘मागे घेणार नाही’ असे ट्रम्प यांनी रविवारी जाहीर केले. त्यामुळे आधीच धास्तावलेल्या भांडवली बाजारांची सप्ताहाच्या सुरुवातीला गाळण उडाली. ‘सेन्सेक्स’ने गेल्या १० महिन्यांतील दिवसातील सर्वात मोठी २,२२७ अंशांची घसरण नोंदविली. दिवसाच्या सुरुवातीच्या जवळपास ४,००० अंशांच्या घसरगुंडीतून सेन्सेक्स लक्षणीय सावरला, तरी दिवसअखेरच्या त्याच्या तीन टक्क्यांच्या नुकसानीने गुंतवणूकदारांच्या तब्बल १४.०९ लाख कोटी रुपयांच्या मत्तेला गिळून टाकले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ही ७४२.८५ अंशांनी घसरला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांतील हिंदुस्तान युनिलिव्हरचा अपवाद केल्यास सर्व आघाडीचे समभाग मोठ्या घसरणीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजारात ३,३९१ शेअर्स घसरणीत, तर वाढ साधणारे केवळ ५४३ शेअर्स होते. व्यापक बाजाराला विक्रीचा दणका अधिक मोठा बसताना दिसला,

गेल्या आठवड्यात लादलेली कर वाढ उठवली जाण्यासाठी परदेशातील सरकारांना ‘खूप पैसा’ मोजावा लागेल, असा ट्रम्प यांनी आग्रह कायम राखल्याने सोमवारी जागतिक बाजारपेठांमधील घसरणीचे सत्र सुरूच राहिले. आशियाई बाजारपेठांमध्ये, सोमवारी हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक १३ टक्क्यांहून अधिक, टोक्योचा ‘निक्केई २२५’ जवळजवळ ८ टक्क्यांहून अधिक, चीनचा ‘शांघाय एसएसई कंपोझिट’ निर्देशांक ७ टक्क्यांहून अधिक आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी ५ टक्क्यांहून अधिक घसरला. युरोपीय बाजारपेठांमध्येही विक्रीचा प्रचंड दबाव दिसून आला आणि तेथील प्रमुख निर्देशांकांनी ६ टक्क्यांहून घसरणीसह सोमवारचे व्यवहार सुरू केले.

बाजारातील ताजी घसरण ही जागतिक घटनांचा स्पष्ट परिणाम आहे. जागतिक व्यापाराने नवीन परिस्थितीशी जुळवून घेईपर्यंत सध्याचे अनिश्चित वातावरण कायम राहील. बाजाराने तळ गाठला हे सांगणे कठीण असले, तरी गुंतवणूकदारांनी कंपन्यांची मिळकत कामगिरी आणि मूल्यांकन यावर लक्ष ठेवावे आणि सध्याच्या अनिश्चित वातावरणातून सकारात्मक, पण सावध पावले टाकावीत. – शिव छनानी, वरिष्ठ निधी व्यवस्थापक, बडोदा बीएनपी परिबा म्युच्युअल फंड

अमेरिकेने लादलेले वाढीव आयात कर आणि त्याला इतर देशांच्या प्रत्युत्तरामुळे व्यापार युद्ध सुरू होण्याच्या भीतीने बाजार कोसळला. माहिती-तंत्रज्ञान आणि धातूंसारख्या क्षेत्रांतील समभागांमध्ये याचे भीषण पडसाद उमटले. उच्च चलनवाढीचा धोका आणि अमेरिकेत संभाव्य मंदीचा याच क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम दिसू शकतो – विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड

विक्रीचा तडाखा

हिंदुस्तान युनिलिव्हर वगळता सेन्सेक्स-निफ्टीतील सर्व शेअर्स तोट्यात

एप्रिलमधील चार सत्रात प्रमुख निर्देशांकांचे ५ टक्क्यांचे नुकसान

निफ्टी मेटल निर्देशांक सर्वाधिक ८ टक्के, तर आयटी निर्देशांक

बीएसईवर ७७५ कंपन्यांचे शेअर्सनी ५२ आठवड्यांच्या तळ गाठला

७५,३६४.४९ शुक्रवारचा बंद

चीनवर आणखी व्यापारकर?

ट्रम्प यांच्या करवाढीला जशास तसे प्रत्युत्तर देत चीनने कर लादल्याने व्यापारयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. ‘चीनने हे शुल्क मंगळवारपर्यंत मागे न घेतल्यास त्यांच्यावर आणखी ५० टक्के कर लादू’ असा धमकीवजा इशारा ट्रम्प यांनी सोमवारी दिला. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिकी बाजारपेठेत मंदी अवतरण्याची भीती आहे. याचा थेट परिणाम जागतिक बाजारपेठेवर होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

● सेन्सेक्स शुक्रवारी ७५,३६४.४९ अंशावर बंद झाला.

● सोमवारी बाजार उघडताच ७१,४४९.९४ अंशाने सुरुवात झाली.

● दुपारी १२.३० वाजता ७१,४२५ अशांची निचांकी पातळी गाठली.