लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: सरकारी रुग्णालयांमध्ये उंदीर व माजरांचा नेहमीच सुळसुळाट झाला आहे. या उंदरांमुळे रुग्णांनाही अनेकदा त्रास होतो. उंदरांना रुग्णालयातून हाकलण्यासाठी आता मुंबई महानगरपालिकेकडून उच्च ध्वनी लहरींचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. त्यानुसार उंदरांचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी उच्च ध्वनी लहरींचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक रुग्णालयामध्ये एक समिती स्थापन करून त्याद्वारे या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचा पदभार स्वीकारताच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी रुग्णालयांमधील सुविधा आणि स्वच्छतेचा आढावा घेण्यास सुरुवात केली. या तपासणीमध्ये डॉ. सुधाकर शिंदे यांना रुग्णालयांमध्ये स्वच्छतेचा अभाव आढळून आला. त्याचबरोबर त्यांना रुग्णालयाच्या आवारात उंदीर, कुत्रे, मांजर आदी प्राण्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात आढळून आला. त्यानुसार शिंदे यांनी रुग्णालयाच्या स्वच्छतेवर भर देण्याबरोबरच रुग्णालयातील उंदरांविरोधात विशेष मोहीम हाती घेण्याच्या सूचना कीटकनाशक विभागाला दिल्या आहेत.
हेही वाचा… “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचे अनेकवेळा प्रयत्न झाले, काहीवेळा…”; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
कीटकनाशक विभागाने राबविलेल्या मोहीमेच्या पहिल्या टप्प्यात ८०० तर दुसऱ्या टप्प्यात ७०० हून अधिक उंदीर मारण्यात आले. मात्र ही प्रक्रिया त्रासदायक असल्याने मुंबई महानगरपालिकेकडून रुग्णालयाच्या परिसरातील उंदीरांना पळवून लावण्यासाठी उच्च ध्वनी लहरींचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रत्येक रुग्णालयात समिती गठीत करण्यात येणार आहे. ही समिती या तंत्रज्ञानाची चाचणी घेणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास महापालिकेची सर्व प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, दवाखाने आणि प्रसुतिगृहांमध्ये त्याचा वापर करण्यात येणार आहे.
उच्च ध्वनी लहरी कशाप्रकारे काम करतात?
उंदरांना उच्च ध्वनी लहरी आवडत नाहीत. त्यामुळे ध्वनी लहरी निघताच उंदीर त्या परिसरातून पळ काढतात. ध्वनी लहरींमुळे उंदीरच नाही तर डास, माशा आणि झुरळेही तेथून दूर राहतात. ध्वनी लहरी पर्यावरणदृष्ट्याही सुरक्षित असतात. याद्वारे उंदीर आणि कीटकांना न मारता रुग्णालयाच्या परिसरातून बाहेर काढण्यात येणार आहे.