गणेशोत्सवातील ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’चा वापर घटला
पर्यावरण संतुलनात फार मोठे विघ्न ठरलेल्या गणेशोत्सवाच्या सजावटींमधील थर्माकोलपाठोपाठ आता मूर्तीकामांसाठी वापरले जाणारे प्लास्टरही लवकरच हद्दपार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हाताळण्यास सोपे, हलके आणि शाडूच्या तुलनेत स्वस्त असल्याने गणेशमूर्ती बनविण्यात फार मोठय़ा प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा वापर केला जात होता. मात्र पर्यावरणस्नेही उत्सव साजरे करण्याबाबत सातत्याने सुरू असलेले प्रबोधन आणि शासनाने लागू केलेल्या बंधनांमुळे यंदाच्या वर्षी प्लास्टरच्या मूर्तीमध्ये मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. प्लास्टरच्या तुलनेत शाडूची मूर्ती बनवायला अधिक कौशल्य आणि वेळ लागतो. त्यामुळे साहजिकच किंमत थोडी जास्त असते. मात्र निसर्ग रक्षणासाठी ती किंमत मोजायला भाविक तयार होत आहेत. पेण, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरांतील मूर्तिकारांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा शाडूच्या मूर्तीचे प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक आहे.
शाडूची मूर्ती आणि थर्माकोलची सजावट या समीकरणामुळे गणेशोत्सव काळात पर्यावरणाची मोठी हानी होत होती.प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पाण्यात विरघळत नाही. तसेच थर्माकोलचेही विघटन होत नाही. त्यामुळे नैसर्गिक नाले आणि जलसाठे संकटात आले होते.गेली काही वर्षे सातत्याने याबाबतीत प्रबोधन सुरू आहे. परिणामी शाडूच्या मूर्तीची मागणी वाढली आहे. त्यामुळे पूर्वी केवळ पाच-सहा महिने काम करणाऱ्या मूर्तिकारांना आता आठ-दहा महिने काम मिळू लागले आहे. शाडूच्या मूर्तीची मागणी किमान तीन महिने आधी नोंदवावी लागते. अनेक भाविकांना ते अद्याप माहिती नाही. त्यांना ऐनवेळी बाजारात शाडूची मूर्ती मिळत नाही. हे वास्तव लक्षात घेऊन काही मूर्तिकारांनी यंदा मागणी व्यतिरिक्त जास्तीच्या शाडू मूर्ती घडविल्या आहेत.
पेणमधून मोठय़ा प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती मागविल्या जातात. मात्र यंदा पेणमध्येही ६० टक्के मूर्ती शाडूच्या बनविल्या जात असल्याची माहिती मूर्तिकार सुभाष कुंभार यांनी दिली.
दहा वर्षांपूर्वी ८० टक्के मूर्ती प्लास्टरच्या होत्या. काही मोजकेच लोक शाडूच्या मूर्ती घडवून घेत असत. आता मात्र चित्र पूर्णपणे बदललेय. निम्म्याहून अधिक शाडूच्या मूर्तीना मागणी आहे. मात्र आता इच्छा असूनही आम्ही त्यांना शाडूची मूर्ती देऊ शकत नाहीत. नागरिकांनी फेब्रुवारी-मार्च महिन्यातच मूर्ती सांगितल्यास त्यांना ती उपलब्ध करून देणे सोयीचे ठरेल.
– नाना कडू, मूर्तिकार, अंबरनाथ
दहा वर्षांपासून कारखान्यातून प्लास्टरच्या मूर्तीची विक्री बंद आहे. आम्ही फक्त शाडूच्याच मूर्ती विकतो. त्या मूर्तीचे घरातच विसर्जन करून माती आम्हाला परत आणून दिली, तर पुढील वर्षांच्या बिलात ग्राहकाला तितके पैसेही वळते करून देतो.
– रवींद्र रामचंद्र कुंभार,मूर्तिकार, बदलापूर गाव.