दसऱ्याच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन करण्याची परंपरा महाराष्ट्रात नवीन नाही. मात्र ज्येष्ठ गायिका उषा उथ्थुप यांनी केदार शिंदे दिग्दर्शित ‘खो खो’ या चित्रपटासाठी मराठी गाणे गाऊन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वेगळ्या प्रकारे सीमोल्लंघन केले आहे. या गाण्याची गंमत म्हणजे मराठी संगीतसृष्टीतील एक अष्टपैलू आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैशाली सामंत हिनेच हे गाणे संगीतबद्ध केले आहे. एका स्त्री संगीतकाराच्या संगीत दिग्दर्शनाखाली गाण्याची ही आपली पहिलीच वेळ होती. वैशालीने या गाण्याला उत्तम संगीत दिले असल्याने गायला खूप मजा आली, असे उषाजींनी ‘लोकसत्ता’शी खास बातचीत करताना सांगितले.
‘खो खो’ या चित्रपटाचे संगीत शशांक पवार यांनी केले आहे. मात्र आम्हाला चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी एक गाणे ध्वनिमुद्रित करायचे होते. त्याचे ओंकार मंगेश दत्त याने लिहिलेल्या गाण्याला वैशालीने सुरेख चाल लावली आहे. ‘खो खो’ या खेळातील सर्व थरार, मजा व खिलाडूवृत्ती या गाण्यात जशीच्या तशी उतरली आहे. त्याशिवाय उषाजींनी हे गाणे त्यांच्या नेहमीच्या शैलीत मस्तच गायले आहे, असे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सांगितले. लहानपणापासून मुंबईत वाढल्याने मराठीशी चांगलीच ओळख होती. पण काही शब्दांचे उच्चार अडखळले, तर मी तडक वैशालीला विचारून घेत होते, असे उषाजी म्हणाल्या. अत्यंत सोपे शब्द असलेल्या या गाण्याच्या प्रत्येक शब्दातून जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगितलेले आहे..
‘चिका, पिका, रोला, रिका..गेम झाला स्टार्ट
पळा पळा, पळणे हे आयुष्याचा पार्ट
रेडी, स्टेडी होऊन म्हणा, स्वत:लाच गो
कोणी येतो टपली मारून, देऊन जातो खो’
असे शब्द असलेले हे गाणे उषा उथ्थुप यांच्या आवाजात लवकरच ऐकायला मिळणार आहे. ‘खो खो’ हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होणार असून पहिल्यांदाच ‘खो खो’ खेळावर चित्रपट बनत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा