मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उत्तन – विरार सागरी सेतू बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ५५ किमी लांबीच्या या प्रकल्पासाठीच्या ८७४२७.१७ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास नुकतीच एमएमआरडीए प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सागरी सेतूचा प्रस्ताव पर्यावरण मंजुरीसाठी सरकारकडे सादर करण्यात आला आहे. प्रस्तावानुसार या सागरी सेतूच्या कामादरम्यान उत्तन – विरार पट्टयातील तब्बल ४.९४ एकर कांदळवण बाधित होणार आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
प्रकल्पात संरचनात्मक बदल
मुंबई महानगरपालिकेने वर्सोवा – दहिसर दरम्यान २२ किमी लांबीचा सागरी किनारा मार्ग प्रकल्प हाती घेतला आहेत. त्यापुढे एमएमआरडीए उत्तन – विरार सागरी सेतू बांधणार आहे. ५५ किमी लांबीचा सागरी सेतूचा प्रस्ताव नुकताच एमएमआरडीएने पर्यावरण परवानगीसाठी पाठवला आहे. समुद्रातून सागरी सेतू, तर किनारा मार्गावरून आंतरबदल मार्ग जाणार आहे, त्यामुळे बांधकामादरम्यान मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्यात येणार असून कांदळवनावर कुऱ्हाड पडणार आहे.
पर्यावरणावर कमीत कमी परिणाम होईल याची काळजी घेत प्रकल्पाचे संरेखन करण्यात आल्याचे एमएमआरडीएकडून सांगितले जात असले तरी या प्रकल्पातही पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होणार असल्याचे उघडकीस येत आहे. एमएमआरडीएतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५५ किमी लांबीच्या सागरी सेतू (तीन आंतरबदल मार्गिकांसह) प्रकल्पात तब्बल ३८ एकर कांदळवन बाधित होणार आहे. हे प्रमाण बरेच मोठे आहे. त्यामुळे एमएमआरडीएने हे प्रमाण कसे कमी करता येईल याचा विचार केला आहे. त्यानुसार प्रकल्पाच्या बांधकामात अनेक संरचनात्मक बदल करण्यात आल्याचे एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
पर्यारवणप्रेमी नाराज
उत्तन – विरार दरम्यान ५५ किमी लांबीच्या सागरी सेतूच्या रुंदीअंतर्गत एकूण ३८ एकर कांदळवन क्षेत्र बाधित होणार होते. मात्र हे क्षेत्र कमी करण्यासाठी ६० मीटर उंच स्पॅनचा वापर करत उन्नत पूल बांधण्यात येणार आहेत. तर उन्नत पुलाच्या पाईल कॅपवरही विशेष लक्ष देण्यात येणार आहे. जेणेकरून जागेचा कमीत कमी वापर होईल. त्यामुळे ३८ एकरऐवजी केवळ ४.९४ एकर कांदळवन क्षेत्र बाधित होणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचवेळी बाधित होणाऱ्या कांदळवनाचे नुकसान भरून काढण्यासाठी एमएमआरडीए १९० एकर क्षेत्रावर कांदळवन रोपण करणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पर्यावरणप्रेमींनी मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. विकासाच्या नावावर पर्यावरणाचा ऱ्हास कधी थांबणार हा प्रश्नच आहे. कांदळवन पर्यावरणाचे संतुलन राखणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. सर्वाधिक कार्बन डायऑक्साईड शोषून घेत प्राणवायू देणारा हा घटक आहे. यातूनच त्याचे महत्त्व अधोरेखीत होते. त्याचवेळी कांदळवनामुळे जमिनीची धूप रोखली जाते, मत्स पालनास मदत होते, त्सुनामी, वादळात संरक्षण होते. असे असताना इतक्या मोठ्या संख्येने कांदळवन नष्ट करणे धोक्याचे आहे, असे प्रतिक्रिया ‘वनशक्ति’चे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी सांगितले.
त्याचवेळी अनेक सरकारी यंत्रणा आधी अधिक क्षेत्र बाधित होईल असे जाहीर करतात. त्यानंतर बाधित क्षेत्र वाचविण्यासाठी, पर्यारवणाला धक्का पोहचू नये यासाठी बाधित क्षेत्र कमी करण्यात आल्याचे सांगितले जाते. तोच प्रकार एमएमआरडीएकडून या प्रकल्पात केला जात आहे. ४.९४ एकर कांदळवन क्षेत्र बाधित होणे हे धोकादायक असल्याचेही स्टॅलिन यांनी स्पष्ट केले.