उत्तराखंडमधील नैसर्गिक तांडवात नक्की किती जण बेपत्ता आहेत याचा अंदाज शासकीय यंत्रणांना येत नसला तरी राज्यातील २३४ पर्यटकांचा त्यांच्या नातेवाईकांशी किंवा शासकीय यंत्रणांशी अद्याप संपर्क झालेला नाही. या पर्यटकांना शोधण्याकरिता डेहराडूनमधील शासनाच्या मदत पथकाने लष्कर व स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.
सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार राज्यातील २३४ जणांचा संपर्क झालेला नाही, असे मदत व पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सांगितले. संपर्क होऊ न शकलेल्यांमध्ये सर्वाधिक ११३ जण औरंगाबाद विभागातील असून, ८५ जण नाशिकमधील आहेत. पुणे (२८), नागपूर आणि अमरावती विभागांतील प्रत्येकी चार जणांचा संपर्क होऊ शकलेला नाही. आतापर्यंत राज्यातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती शासनाकडे उपलब्ध झाली आहे. यातील दोन जण मुंबईतील तर एक ठाण्यातील आहे.
राज्यातील आठ यात्रा कंपन्यांमार्फत या काळात ७२६ जण उत्तराखंडमध्ये गेले होते. यापैकी पुण्यातील ‘अंबिका’ आणि ‘शिवगौरी’ या दोन यात्रा कंपन्यांबरोबर गेलेल्या २५ जणांचा संपर्क होऊ शकलेला नाही, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख आय. एस. कुंदन यांनी दिली.
राज्यातील २९६० जण उत्तराखंडमध्ये होते. यापैकी ११०३ जण राज्यात परतले आहेत. १२५० जण परतीच्या मार्गावर आहेत. ३७० जणांचा संपर्क झाला असला तरी ते विविध ठिकाणी अडकले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा