राज्य शासनाकडून दिला जाणारा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक के.ज. पुरोहित ऊर्फ शांताराम आणि कवीवर्य ना.धों. महानोर यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रकाशन संस्थेस दिला जाणारा ‘श्री. पु. भागवत पुरस्कार’ मॅजेस्टिक प्रकाशन संस्थेला दिला जाणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.
मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साहित्यिकास दिल्या जाणाऱ्या २०११ च्या जीवनगौरव पुरस्कारासाठी पुरोहित यांची तर २०१२ च्या पुरस्कारासाठी महानोर यांची निवड करण्यात आली. पुरस्कारांचे वितरण मराठी भाषा दिनी २७ फेब्रुवारीला केले जाणार आहे.
विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार निवड समितीची बैठक सह्य़ाद्री अतिथीगृह येथे बुधवारी आयोजित करण्यात आली होती. त्यास मुख्यमंत्री चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे आदी उपस्थित
 होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘विंदा’हे प्रज्ञावंत आणि प्रतिभावंत- प्रा. के. ज. पुरोहित
दिवंगत विंदा करंदीकर हे प्रज्ञावंत आणि प्रतिभावंत होते. त्यांच्या नावाने दिला जाणाऱ्या  पुरस्कारासाठी माझी निवड झाली या पेक्षा जास्त आनंदाची दुसरी कोणतीही गोष्ट नाही, अशा भावना के. ज. पुरोहित यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केल्या. हा पुरस्कार म्हणजे गेली अनेक वर्षे आपण जे काही लिहीत आहोत, त्याला मिळालेली पावतीच असल्याचे सांगून पुरोहित म्हणाले की, आता या वयात कोणतेही औषध वा टॉनिकपेक्षा असे पुरस्कार उभारी देतात. वाचन, लेखन याला आता आणखी बहर येईल. माझ्या लेखनाची दखल घेऊन जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल मी कृतज्ञ आहे.  

‘विंदां’च्या कवितेने शक्ती दिली-ना. धों महानोर
विंदा करंदीकर, पु. ल., कुसुमाग्रज यांच्या कविता आणि लेखनाने मला शक्ती मिळाली. विंदांनी दिलेल्या कवितेच्या दिव्यातील बिंदू मी माझ्या परीने पुढे घेऊन चाललो आहे. या पुढेही मी सकस आणि चांगले देण्याचा प्रयत्न करेन, असे महानोर यांनी सांगितले. विंदांनी कवितेतून नवता मांडताना परंपरेचेही भान राखले त्यामुळे त्यांची कविता आजही टिकून राहिली आहे. त्यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी माझी निवड झाली, यात आनंद आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: V d karandikar award to k j purohit mahanor
Show comments